ईदच्या नमाजासाठी 'ताजमहाल'मध्ये तीन तास मोफत प्रवेश

या तीन तासांमध्ये परदेशी पर्यटकांनाही मोफत प्रवेश असेल.

Updated: Aug 11, 2019, 03:25 PM IST
ईदच्या नमाजासाठी 'ताजमहाल'मध्ये तीन तास मोफत प्रवेश

मुंबई: जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालात सोमवारी तीन तासांसाठी मोफत प्रवेश मिळणार आहे. देशभरात सोमवारी साजऱ्या होत असलेल्या बकरी ईदनिमित्त हा निर्णय घेण्यात आला. 

ईद-उल-फितुर आणि ईद-उल-अझा या दोन दिवशी स्थानिक मुस्लीम समुदाय ताजमहालाच्या आतमध्ये असणाऱ्या मशिदीत नमाज पडण्यासाठी येतात. त्यानुसार उद्या म्हणजे १२ ऑगस्टलाही ताजमहालात विशेष नमाज पढण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, ईदच्या दिवशी दिल्ली, कानपूर, लखनऊ या भागांतून लोक येतात.

त्यामुळेच भारतीय पुरातत्त्व खात्याने सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान तीन तासांच्या कालावधीत ‘ताजमहाल’मध्ये मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ नमाज पठणासाठी नव्हे तर देश-परदेशातून येणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी नियोजित तीन तासांमध्ये मोफत प्रवेश असेल. यानंतर १० वाजल्यापासून पर्यटकांकडून नेहमीप्रमाणे शुल्क आकारले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

मात्र, या तीन तासांमध्ये लोकांना ताजमहालात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची तपासणी केली जाईल. त्यांना आतमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, धारदार वस्तू, काडीपेटी, लायटर्स आणि खाण्याच्या वस्तू नेण्यास मनाई असेल. 

एरवी नेहमीच्या काळात ताजमहालात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकी ५० रुपयांचे शुल्क आकारले जाते. तर परदेशी लोकांना ११०० रुपये भरून ताजमहालात प्रवेश करावा लागतो. तसेच ताजमहालच्या मुख्य घुमटावर प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला २०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतात.