Bank Locker: धक्कादायक! बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटांना लागली वाळवी; 215000 रुपयांची झाली रद्दी

Termites Eat Rs 2 Lakh 15 thousand Cash: हे प्रकरण समोर आल्यानंतर इतर ग्राहकांनीही या बँकेच्या शाखेमध्ये गर्दी केली. यानंतर हे ग्राहक आणि बँक व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.

Updated: Feb 10, 2023, 06:47 PM IST
Bank Locker: धक्कादायक! बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटांना लागली वाळवी; 215000 रुपयांची झाली रद्दी title=

Termites Eat Rs 2 Lakh 15 thousand Cash Kept In PNB Bank Locker: बँकेच्या (Bank) लॉकरमध्ये (Locker) ठेवलेले लाखो रुपयांच्या नोटा वाळवीने (Termite) खाल्ल्याचं सांगितलं तर नक्कीच हे वाक्य वाचून आश्चर्य वाटेल. मात्र खरोखर असा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूर येथील पंजाब नॅशनल बँकमध्ये (PNB Bank) हा प्रकार घडला आहे. या बँकेमध्ये एका महिलेनं ठेवलेल्या कॅशला चक्क वाळवी लागली. या वाळवीने चक्क 2 लाख 15 हजार रुपयांच्या नोटा खाल्ल्या (Termites Eat Rs 2 Lakh 15 thousand Cash). या लॉकरच्या मालकीण सुनीता मेहता पैसे काढण्यासाठी बँकेत आल्या आणि त्यांनी आपला 265 क्रमांकाचा लॉकर उघडला तेव्हा हा सारा प्रकार समोर आला.

वाळवी लागलेल्या नोटा

सुनीता यांनी आपल्या लॉकरमधील पैशांची बॅग घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना लॉकरच्या बाहेर वाळवी असल्याचं दिसून आलं. त्यांनी लॉकर उघडलं तेव्हा त्यांना नोटांची अवस्था पाहून धक्काच बसला. 15 हजार रुपये मूल्य असलेलं 50 रुपयांच्या नोटांचं बंडल पूर्णपणे पोखरलेल्या अवस्थेत होतं. तीन तास कर्मचाऱ्यांशी वाद घातल्यानंतर या नोटा बदलून देण्यात आल्या.

घरी गेल्यावर बसला मोठा धक्का

प्रकरण इथेच संपले नाही. घरी गेल्यानंतर सुनीता यांना आणखीन मोठा धक्का बसला. सुनीता यांच्या लॉकरमधील या बॅगेमधील एका पिशवीत ठेवलेल्या 2 लाख किंमतीच्या 500 रुपये मूल्याच्या नोटांचे बंडलही वाळवीने कुरतडल्याप्रमाणे दिसल्या. या नोटांना छोट्या छोट्या आकाराची छिद्रं दिसून आली. विशेष म्हणजे या प्रकरणामुळे कालाजी गोराजी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या अन्य लॉकर्समध्येही वाळवी असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

बँकेवर केले गंभीर आरोप

बँकेने वेळोवेळी पेस्ट कंट्रोल केलं नाही म्हणून असं झाल्याचा आरोप सुनीता यांनी केला आहे. सुनीता यांचा धाकटा भाऊ मनोज लोढाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता मेहता यांना बँकेने 265 क्रमांकाचं लॉकर दिलं होतं. हे लॉकर यापूर्वी मे 2022 मध्ये उघडण्यात आलं होतं. सुनीताच्या जवळच्या नातेवाईकाचं निधन झाल्याने शुक्रवारी त्यांच्याकडे धोवराचा (नातेवाईकांना पाकिटांमधून काही ठराविक रक्कम देण्याची प्रथा) कार्यक्रम होता. त्यासाठी पैसे काढायला सुनीता गुरुवारी बँकेत गेल्या होत्या. तेव्हा पैसे काढल्यानंतर त्यांना पैशांना वाळवी लागल्याचं लक्षात आलं.

कोट्यावधी रुपयांचं नुकसान?

खरोखरच या बँकेच्या इतर लॉकरमध्येही वाळवी असेल तर पीएनबी बँकेच्या या लॉकर्समध्ये कॅश ठेवणाऱ्यांबरोबरच बँकेलाही मोठा फटका बसणार आहे. अनेक लोक आपल्या प्रॉपर्टीचे कागदपत्रं आणि महत्त्वाचे कागदपत्रंही लॉकरमध्ये ठेवतात. त्यामुळे खरोखरच या वाळवीचा सर्व लॉकरमध्ये प्रसार झाला असेल तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान कदाचित कोट्यावधींच्या आकडेवारीत असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

ग्राहक आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

बँकेच्या लॉकरला वाळवी लागल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेक ग्राहक बँकेत पोहचले. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना बेजबाबदारपणासाठी फैलावर घेतलं. बँक प्रशासन आणि ग्राहकांमध्ये बराच वेळ वादावादी सुरु होती. बँकेच्या उच्चपदस्थ अधिकारी आणि लॉकर सेवा घेतलेल्या ग्राहकांनी फोन करुन यासंदर्भातील माहिती दिली जात आहे. त्यामुळे आता सविस्तर अहवाल सादर केल्यानंतरच इतर लॉकरमध्येही अशाच प्रकारे वाळवी लागली आहे का? लागली असेल तर नेमकं किती नुकसान झालं हे समजणार आहे.