नवी दिल्ली : Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीर भारतात सध्या रॅपिड टेस्टींगचं प्रमाण वाढवण्यात आलं असून, Lockdown लॉकडाउनचाही कालावधी वाढवण्यात आला आला आहे. सावधगिरीची पावलं म्हणून भारतात शक्य ते सर्व उपाय योजले जात असून, आता त्याचे परिणाम काही अंशी दिसून येऊ लागले आहेत. शुक्रवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या दैनंदिन माहिती सत्रात याविषयीच्या .काही महत्त्वाच्या गोष्टी मांडण्यात आल्या.
कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्याच्या प्रामाणात काही अंशी घट झाल्याची अतिशय महत्त्वाची माहिती यावेळी आरोग्य मंत्रालयाच्या लव अग्रवाल यांनी दिली. 'राष्ट्रीय पातळीवर तुलना केल्यास रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचं प्रमाण १९ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमध्ये घटलं आहे. ज्यामध्ये केरळ, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, छत्तीसगढ, लडाख आणि इतरही काही राज्यांचा समावेश आहे', असं ते म्हणाले.
लॉकडाऊनपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या ही दर तीन दिवसांनी दुपटीने वाढत होती. जो चिंतेचा विषय़ होता. पण, सध्याच्या सर्व्हेक्षणानुसार आणि हाती आलेल्या माहितीनुसार मागील सात दिवासंमध्ये हे प्रमाण घटलं असल्याची बाब आरोग्य मंत्रालयाकडून मांडण्यात आली.
मुख्य म्हणजे कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवूनही रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसत आहेत. त्यामुळे ही बाब काही अंशी दिलासा देणारी ठरत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही असंच चित्र दिसत असल्याचं गुरुवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झालं.
Before lockdown, doubling rate of #COVID19 cases was about 3 days, but according to data in the past 7 days, the doubling rate of cases now stands at 6.2 days. Doubling rate in 19 States, Union Territories are even lower than average doubling rate: Lav Aggrawal, Health Ministry pic.twitter.com/ycYpchvc2Z
— ANI (@ANI) April 17, 2020
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग हा दोन दिवसांवरून ६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे हा कालावधी जितका वाढेल तितकं राज्याच्या दृष्टीने फायद्याचं आणि समाधानाचं असेल असं त्यांनी सांगितलं होतं. थोडक्यात देशात आणि राज्यातील परिस्थितीचं एकंदर चित्र पाहता येत्या काळात कोरोनावर मात करण्याचेच आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न असतील.