कोलकाता: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कोलकाता येथील रिक्षा ओढणाऱ्या मुलीचे छायाचित्र तुफान व्हायरल झाला होते. ही मुलगी आयएएस परीक्षेतील टॉपर असून रिक्षात बसलेली व्यक्ती या मुलीचे वडील असल्याचा संदेशही या छायाचित्रासोबत फिरत होता. तामिळनाडूतील काँग्रेसचे नेते जे. अस्लम यांनीदेखील हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. यानंतर देशभरातून या मुलीवर कौतुकाचा वर्षाव झाला.
मात्र, आता या छायाचित्रामागची खरी कहाणी समोर आली आहे. छायाचित्रातील रिक्षा ओढणाऱ्या मुलीचे नाव शर्मोना पोद्दार असे आहे. ही मुलगी आयएएस टॉपर नसल्याची माहिती समोर आली आहे.
शर्मोनाला फिरण्याची हौस असून तिने काही दिवसांपूर्वी वाईल्डक्राफ्ट कंपनीसाठी हे फोटोशूट केले होते. कोलकाताच्या शोभा बाजार परिसरात हे फोटोशूट झाले होते. यावेळी तिचे रिक्षा ओढतानाची छायाचित्रे काढण्यात आली होती. आपण हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना रिक्षेत बसलेल्या व्यक्तीचा उल्लेख 'रिक्षा अंकल' असे केल्याचे शर्मोनाने स्पष्ट केले आहे.
शर्मोनाच्या या खुलाशानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. मात्र, इंटरनेटवर अशाप्रकरची खोटी छायाचित्रे व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा चुकीच्या छायाचित्रामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले होते.