बच्चू कडू विरुद्ध रवी राणा वादाचा पुढील अंक पुन्हा सुरू झाला आहे. आता तर बच्चू कडूंनी रवी राणांना मोठं चॅलेंज दिलं आहे. ते चॅलेंज राणांनी स्वीकारलंदेखील आहे. काय आहे हे चॅलेंज आणि अमरावतीत यामुळे काय घडामोडी घडणार पाहुयात या खास रिपोर्टमधून..
अमरावतीत बच्चू कडू विरुद्ध रवी राणा या वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. अचलपूरमधून बच्चू कडूंचा पराभव आपण घडवून आणल्याचा दावा राणा दाम्पत्यांनी केला आहे. नवनीत राणांच्या दाव्याचा त्याच भाषेत बच्चू कडूंनी समाचार घेतला. राणांनी कोणत्याही निवडणुकीला उभं राहवं, मी त्यांच्या विरोधात अपक्ष लढण्यास तयार असल्याचं थेट आव्हान बच्चू कडूंनी दिलं आहे.
"बच्चू कडूला आम्ही पाडलं सांगत आहेत. त्यांची औकात नाही आम्हाला पाडण्याची. असं असेल तर तुम्ही सांगा कोणताही मतदारसंघ निवडा, मी तिथून उभा राहतो. तुम्हीदेखील आणि मीदेखील विनापार्टीचं," असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
बच्चू कडूंनी दिलेलं आव्हान रवी राणांनी स्वीकारलं आहे. पाच वर्षानंतर आपण अचलपूरमधूनच बच्चू कडूंविरोधात निवडणूक लढवू त्यांनी तयार राहावं असा पलटवार राणांनी केला आहे. "अचलपूरमधील जनतेने त्यांना धडा शिकवला आहे. सुपारीबाजाला अचलपूरमधील जनतेने त्याची जागा दाखवली आहे. जास्त बोलल्यामुळे बच्चू कडू पडलेले आहेत. पाच वर्षानंतर त्यांना वाटलं मी अचलपूरमधून उभा राहीन," असं ते म्हणाले आहेत.
इतकंच नाही तर नवनीत राणांनीही कडूंवर शेलक्या भाषेत प्रहार केला. "आपल्या मतदारसंघात दिवे लावू शकले नाहीत ते दुसऱ्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावणार? मी कुठे म्हणतीये माझं श्रेय आहे. माझ्या जनतेने बदला घेतला असून, त्यांना आपली जागा दाखवून दिली आहे. येणाऱ्या काळातही दिसेल. पण दादा आता कसं गोड गोड लागतंय ना," असा टोलाही त्यांनी लगावला.
बच्चू कडू पुढील काही दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश कऱणार असल्याचा गौप्यस्फोट रवी राणांनी केला आहे. "आमागी काळात बच्चू कडू एखाद्या पक्षात प्रवेश करतील. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत लवकरच त्यांचा प्रवेश होणार आहे," असा दावा त्यांनी केला आहे. प्रहार विरुद्ध युवा स्वाभिमान यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा पेटला आहे. त्यामुळे कडू विरुद्ध राणा राजकीय वाद आता कोणत्या टोकाला जाईल हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच.