साध्वीच्या बचावानंतर 'चौकीदार' हेगडेंचा ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा दावा

गांधीजींच्या मृत्यूचं समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही - अनंत कुमार हेगडे

Updated: May 17, 2019, 12:29 PM IST
साध्वीच्या बचावानंतर 'चौकीदार' हेगडेंचा ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा दावा  title=

बंगळुरू : भोपाळमधून भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्या 'नथुराम गोडसे' वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून साध्वीची पाठराखण करण्यात आली होती. 'माफीची गरज नाही... गोडसे यांच्याप्रती आपली नजर बदलण्याची गरज आहे' असं हेगडे यांच्या ट्विटरवर दिसलं... आणि आणखीन एक नवा वाद उभा राहिला. परंतु, आता मात्र अनंत कुमार हेगडे यांनी आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाला असून 'ते' ट्विट आपण केलं नसल्याचा दावा केलाय. 

'साध्वी प्रज्ञा हिनं नथुराम गोडसे हा देशभक्त होता' असं वक्तव्य केलं. त्यानंतर झालेल्या टीकेमुळे प्रज्ञा हिच्यावर माफी मागण्याची वेळ आली. भाजपनं स्वत:ला या वक्तव्यापासून वेगळं करून घेतलं. परंतु, कर्नाटकचे खासदार अनंत कुमार हेगडे यांच्या ट्विटर हॅन्डलवरून प्रज्ञा हिचा बचाव करण्यात आला होता. '७० वर्षानंतर का होईना बदललेल्या वैचारिक वातावरणात गोडसे यांच्यावर चर्चा होत आहे. गोडसेंनाही या चर्चेमुळे आनंद होत असेल' असं लिहिल्याचं त्यांच्या ट्विटरवर दिसून आलं. 


अनंत कुमार हेगडे यांच्या ट्विटर अकाऊंटवरून डीलिट करण्यात आलेलं ट्विट

परंतु, आता मात्र 'चौकीदार' अनंत कुमार हेगडे यांनी आपलं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा दाव करण्यात आलाय. 

'कालपासून माझं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. गांधीजींच्या मृत्यूचं समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. गांधीजींच्या हत्येचं समर्थन किंवा सहानुभुतीला थारा दिला जाऊ शकत नाही. गांधीजींनी देशाला दिलेल्या योगदानाचा सगळ्यांनाच आदर आहे' असं ट्विट करतानाच अगोदरच ट्विट डिलीट करण्यात आलेलं आहे. 

दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये 'नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी आहे' असं वक्तव्य कमल हासन यांच्यावर दोन अज्ञातांनी मंचावर कथित रुपात अंडे आणि दगडांचा हल्ला केला. परंतु, पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत कमल हासन यांना सुरक्षित स्थळी हलवलं.