रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: सोनिया गांधी यांच्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तत्पुर्वी काँग्रेसमधील २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपआपलं म्हणणं मांडलं आहे. त्यात नेतृत्व संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा.. पक्षातील मरगळ दूर करावी आणि संपूर्ण काँग्रेसच्या रचनेत बदल करण्याचा सूर निघाला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपची वाट धरणं आणि सचिन पायलट यांचे बंड यामुळे काँग्रेसच्या तरूण पिढीला सोनिया गांधी यांचे नेतृत्व मान्य नाही का, असा सूर मागील काही दिवसांपासून उमटत आहे. त्यामुळे कार्यकारिणीच्या बैठकीकडे लक्ष आलेले आहे.
पक्षातील काही तरूण नेत्यांनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी जोर लावून धरली. तर ज्येष्ठ आणि जुन्या नेत्यांनी मात्र सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाची धुरा असावी अशी मागणी केली जाणार आहे. त्यामुळे भावी अध्यक्ष राहुल गांधी की सोनिया गांधी यावर सोमवारी मंथन होणार आहे. परंतु राहुल गांधी यांनी नकार दिला तर गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणते नाव पुढे येईल याकडेही लक्ष लागले आहे.
पत्रात पुढील मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.
१. नेतृत्वानं संपूर्ण वेळ पक्षाच्या कामासाठी काँग्रेस मुख्यालय आणि प्रदेश काँग्रेससाठी उपलब्ध असावं.
२. अंतर्गत निवडणूक प्रक्रीयेसाठी स्वतंत्र समिती असावी. जेणेकरुन निवडणूकीत पारदर्शकता येईल.
३. सीडब्लूसी सदस्यांची निवड पक्षाच्या घटनेप्रमाणे व्हायला पाहीजे.
४. एआयसीसी, प्रदेश स्तर आणि ब्लॉक स्तरावर निवडणूक पारदर्शक व्हाव्यात.
५. पक्षाला मरगळ आली आहे. त्यातून बाहेर पडावं लागेल. पक्षाला मार्गदर्शन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं. त्यासाठी यंत्रणा तयार करावी.
६. काँग्रेसचे जुने आणि माजी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला पाहीजे.
७. तरूणाईचा विश्वास गमावणे हे चिंताजनक आहे. त्यांना सोबत घ्यावं
८. राष्ट्रीय स्तरावर भाजप विरोधी विचारांना काँग्रेसने सोबत घ्यावं.