मुंबई - ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सगळ्याच बॅंका कायम प्रयत्नशील असतात. यासाठीच आता जुन्या स्वरुपातील एटीएम कार्ड बंद करून नव्या स्वरुपातील कार्ड देण्यास सगळ्याच बॅंकांनी सुरूवात केली आहे. अनेक ग्राहकांनी नव्या स्वरुपातील कार्डचा वापर सुरूही केला आहे. पण अद्याप काही ग्राहकांकडे जुन्या स्वरुपातील एटीएम कार्डच आहेत. त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नववर्षात जुन्या स्वरुपातील एटीएम कार्ड रद्द करण्यात येत आहेत. म्हणजेच या कार्ड्सचा वापर करून ग्राहक बॅंकेच्या खात्यातून कोणताही आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत.
काय फरक आहे नव्या कार्डात
जवळपास सगळ्याच बॅंकांनी पू्र्वी ग्राहकांना मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली कार्ड दिली होती. या कार्डच्या साह्याने एटीएममधून आर्थिक व्यवहार केले जात होते. आता ही कार्ड बंद होणार आहेत. बॅंकांकडून चिप लावलेली ईएमव्ही कार्ड ग्राहकांना दिली जाऊ लागली आहेत. आतापर्यंत जुन्या आणि नव्या रुपातील कार्ड दोन्हीही वापरणे ग्राहकांसाठी शक्य होते. नववर्षात जुन्या स्वरुपातील कार्ड रद्द करण्यात येणार असून, नव्या स्वरुपातील कार्डच्या माध्यमातूनच आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होणार आहे. म्हणजे ज्या कार्डमध्ये चिप लावलेली आहे. तीच कार्ड यापुढे वैध ठरणार आहेत.
पैसे काढता येणार नाही
जुन्या स्वरुपातील मॅग्नेटिक स्ट्रिप असलेल्या कार्डच्या माध्यमातून यापुढे ग्राहकांना एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार नाहीत. ग्राहकांना हे कार्ड बॅंकेकडे परत करून नव्या स्वरुपातील ईएमव्ही चिप असलेले कार्ड घ्यावे लागेल.
नव्या कार्डसाठी काय करावे लागेल
जुनी मॅग्नेटिक स्ट्रिप असलेली कार्ड बंद करण्यात येणार असल्याचे बॅंकांकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. देशातील सर्वांत मोठ्या स्टेट बॅंकेनेही सतत विविध माध्यमातून याची माहिती दिली आहे. जुने एटीएम कार्ड बदलून त्याऐवजी नवे कार्ड घेण्यासाठी माहिती दिली जात आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. त्याचबरोबर तुमच्या शाखेमध्ये जाऊन तिथूनही तुम्ही अर्ज करू शकता. फेब्रवारी २०१७ पासूनच बॅंकांनी जुनी कार्ड बंद केली होती. त्याआधीपासूनच ग्राहकांना नव्या स्वरुपातील कार्ड दिली जात आहेत. पण आता १ जानेवारी २०१९ पासून नव्या रुपातील कार्डच वैध ठरणार आहेत. जु्न्या स्वरुपातील कार्डच्या साह्याने बॅंकांमध्ये कोणताही व्यवहार करता येणार नाही.