Lockdown मध्ये मोबाईलसह या वस्तूंची नाही करता येणार ऑनलाईन खरेदी

लॉकडाऊनमध्ये या वस्तू ऑनलाईन खरेदी करता येणार नाही.

Updated: May 9, 2021, 09:33 PM IST
Lockdown मध्ये मोबाईलसह या वस्तूंची नाही करता येणार ऑनलाईन खरेदी title=

नवी दिल्ली : लॉकडाउनमध्ये घरातून काम करत असताना मोबाईल फोन, लॅपटॉप यासारख्या वस्तूंची आवश्यकता वाढते. परंतु यादरम्यान आपला मोबाईल फोन किंवा लॅपटॉप खराब झाला असेल तर आपल्याला नवीन मोबाईल फोन आणि लॅपटॉपसाठी लॉकडाउन उघडण्याची प्रतीक्षा करावी लागेल. यामागचे कारण म्हणजे सरकारने मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सला अनावश्यक वस्तूंच्या यादीत ठेवले आहे.

देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन आहे. या राज्यांमध्ये किरकोळ दुकाने बंद आहेत. त्याचबरोबर ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणून मोबाईल फोन किंवा लॅपटॉप ऑनलाईन खरेदी करता येणार नाहीत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीत, त्यानंतर महाराष्ट्रात यापूर्वी लॉकडाऊन सुरू आहे. इतर अनेक राज्यातही लॉकडाउन सुरू झाले आहे.

ई-कॉमर्स कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊन असलेल्या राज्यांमध्ये त्यांना मोबाईल फोनसह कोणतीही गॅझेट्स विकण्याची परवानगी नाही, त्यामुळे ते ऑर्डर घेत नाहीत. मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये मोबाईल फोन आणि गॅझेटची ऑफलाइन विक्री बंद आहे, त्यामुळे या वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीला परवानगी देण्यात आलेली नाही, जेणेकरून ऑफलाईन व्यापा-यांना नुकसान होऊ नये.

सीआयआयच्या नॅशनल आयसीटीई मॅन्युफॅक्चरिंग कमिटीचे अध्यक्ष विनोद शर्मा म्हणाले की, लॉकडाऊन दरम्यानही मोबाईल फोन खरेदी करता येतील यासाठी आवश्यक वस्तूंच्या यादीमध्ये त्यांनी मोबाईल फोनचा समावेश करावा. घरातून कामाचा वाढता कल पाहता मोबाइल आणि लॅपटॉप आता अत्यावश्यक वस्तू बनल्या आहेत. ते म्हणाले की, लॉकडाऊन दरम्यान ऑफलाईन व ऑनलाइन दोन्ही मोबाईल फोन व गॅझेट बंद पडल्यामुळे एकूण विक्रीत घट झाली आहे. 

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत कोणती वस्तू आवश्यक व अनावश्यक वस्तूंच्या वर्गात समाविष्ट करायची आहे, ते राज्यांवर अवलंबून आहे. परंतु नंतर मोबाइल फोन आवश्यक वस्तूंच्या श्रेणीत समाविष्ट केल्या जाऊ शकतात. औद्योगिक संस्थांच्या अंदाजानुसार यावर्षी भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 76 कोटी असेल.