नवी दिल्ली : राज्यामध्ये महिन्याभराच्या सत्तासंघर्षानंतर नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करणार आहेत. पण हे सरकार टिकणार नाही, असं भाकित भाजप नेते नितीन गडकरी यांनी वर्तवलं आहे. 'यांच्यामध्ये वैचारिक ताळमेळ नाही. शिवसेना ज्या विचारधारेवर चालते, त्या विचारधारेचा काँग्रेस विरोध करते आणि काँग्रेसच्या विचाराचा शिवसेना विरोध करते. राष्ट्रवादीही शिवसेनेच्या विचाराशी ताळमेळ ठेवत नाही,' असं गडकरी म्हणाले.
'विचार आणि सिद्धांतावर ही आघाडी झालेली नाही. संधीसाधू असलेली ही आघाडी टिकणार नाही आणि महाराष्ट्रात स्थिर सरकार राहणार नाही. यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होईल. अस्थिर सरकार हे महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही,' असं वक्तव्य गडकरींनी केलं आहे.
'भाजप आणि शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या विचाराने झाली होती. त्यामुळे ही युती देशातली सगळ्यात जास्त काळ टिकली. आजही आमच्या विचारात भिन्नता नाही. त्यामुळे ही युती न राहणं हे देशासाठी, विचारधारेचं, हिंदुत्वाचं, महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नुकसान आहे,' अशी प्रतिक्रिया गडकरींनी दिली.