जयपूर : जयपूरच्या मयंक प्रताप सिंह Mayank Pratap Singh यांनी वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी एक किमया करुन दाखवली आहे. राजस्थान ज्युडिशिअल सर्व्हिसेस ही परीक्षा उत्तीर्ण होत, त्यात अव्वल क्रमांच मिळवत मयंक यांनी इतिहास रचला आहे. या परिक्षेत अग्रस्थान मिळवणाऱ्या मयंकचा आदरार्थी उल्लेख होण्याचं कारण म्हणजे देशातील सर्वात कमी वयात न्यायाधीशपदी विराजमान होण्याचा मान त्यांच्या वाट्याला गेला आहे.
काही दिवसांपूर्वी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य म्हणजे राजस्थान ज्युडिशिअल सर्व्हिसेस या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नांत हे यश संपादन केल्यामुळे मयंकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यंदाच्याच वर्षी मयंकने राजस्थान विद्यापीठातून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यातही यंदाच राजस्थान उच्च न्यायालयाकडून परीक्षेसाठीची वयोमर्यादा २१ वर्षे करण्यात आली होती, त्यामुळे याचाही मयंकना फायदा झाला. अर्थात इथे त्यांच्या जिद्दीचीही दाद द्यावी तितकी कमीच आहे.
परीक्षेच्या एकंदर तयारीविषयी विचारलं असता मयंक यांनी आपण या परीक्षेच्या अभ्यासासाठीचं एक वेळापत्रक आखल्याचं सांगितलं. दिवसातील जवळपास १२-१३ तास त्यांनी अभ्यासाला प्राधान्य दिलं. मुळात न्यायाधीश होण्यासाठी प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा असल्याचा विचार त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मांडला. याच इमानदारीच्या बळावर आपल्याला हे यश मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं.
एकिकडे प्रथम स्थानाची चर्चा असताना, दुसऱ्या क्रमांकावर मुलींचं वर्चस्व पाहायला मिळालं. राजस्थान ज्युडिशिअल सर्व्हिसेस या परीक्षेत मुलींचीही प्रशंसनीय कामगिरी पाहायला मिळाली. जयपूरच्याच तन्वी माथूरला दुसरं स्थान मिळालं आहे.