नवी दिल्ली : प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर व्हावा, त्यांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे विभागाकडून काळजी घेतली जाते. प्रवाशांनी ट्विटद्वारे केलेल्या तक्रारीचे समाधान काही मिनिटातं रेल्वेकडून केले जाते. प्रवाशांचा प्रवास आणखी सोपा व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून आणखी एक पाऊल टाकण्यात आले आहे. ज्याप्रकारे एसटी महामंडळाच्या बसचे तिकीट (ऑनलाईन पद्धतीने) आरक्षित करताना गाडीत किती आसने रिक्त आहेत, कोणती आसने रिक्त आहेत, याची माहिती दिली जाते, अशीच माहिती रेल्वे प्रशासन प्रवाशांना देण्याच्या तयारीत आहे.
प्रवाशांना संपूर्ण माहिती मिळावी यासाठी रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे. ही यंत्रणा विकसित करण्यासाठी काही कालावधी द्यावा लागेल. ही सुविधा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत. ही यंत्रणा विकसित करण्यासंदर्भातील संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेच्या आयटी विभागाच्या क्रिस (सेंटर फॉर रेल्वे इन्फोर्मेश सिस्टीम) विभागाला देण्यात आली आहे. रेल्वेत किती आसने रिक्त आहेत, तसेच कोणती आसने रिकामी आहेत या सर्वाची माहिती प्रवाशाला तिकीट काढताना मिळावी, म्हणजे प्रवासी त्याच्या इच्छेनुसार तिकीट काढेल, अशी यंत्रणा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही यंत्रणा सुरु होण्यासाठी निश्चित असा वेळ द्याला लागेल. पण प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांना संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळावी यासाठी रेल्वेमंत्री व प्रशासन प्रयत्नशील आहे. आरक्षित डब्याच्या दरवाजात आरक्षित तिकीटधारकांची यादी लावली जाते. याच प्रकारची यादी प्रवाशांना मोबाईलवर मिळणार आहे. अनेकदा मोबाईलच्या माध्यमातून, प्रवाशांची गोपनीय माहिती गहाळ होण्याची शक्यता असते, हा प्रकार रोखण्यासाठी देखील प्रशासनाने काळजी घेतली आहे. हा प्रकार रोखण्यासाठी त्या यादीत प्रवाशाच्या नावाचा उल्लेख न करता केवळ त्याच्या तिकीटावर असलेल्या पीएनआर नंबरचा उल्लेख केला जाणार आहे.
ही यंत्रणा सुरु झाल्यावर प्रवाशांसाठी खूप फायदेशीर ठरेल. यामुळे ऐनवेळी होणारी प्रवाशांची धावपळ टाळता येणार आहे. ही यंत्रणा निर्माण करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. पण हे अशक्य नाही. लांब पल्ल्याच्या गाड्या अनेक ठिकाणी थांबतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक प्रवाशी चढ-उतार करतात. त्यामुळे एकाच वेळी ही सर्व माहिती अद्ययावत करणे म्हणजे आव्हानात्मक असणार आहे. पण अशक्य नाही. असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.