'टिक टॉक' फेम युवकाची गोळ्या झाडून हत्या

'टिक टॉक'प्रेमी युवकाला गोळ्या झाडून जीवे मारण्यात आलं आहे,

Updated: May 22, 2019, 04:02 PM IST
'टिक टॉक' फेम युवकाची गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली : 'टिक टॉक' या मोबाईल अॅपचे जाळे सर्वत्र पसरले आहे. अनेक तरूणी मंडळी आपलं कौशल्य दाखवण्यासाठी 'टिक टॉक'चा वापर करतात. पण धक्कादायक बाब म्हणजे, एका 'टिक टॉक'प्रेमी युवकाला गोळ्या झाडून जीवे मारण्यात आलं आहे, ही घटना दिल्लीत घडलीय. नजफगड भागात २४ वर्षीय मोहितची हत्या करण्यात आली आहे. 

ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. हत्या करून आरोपींनी पलायन केले आहे. वरील घटनेचा तपास पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून करत आहेत. मोहितची हत्या नक्की कोणत्या कारणावरून करण्यात आली, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. 

मोहित एक 'टिक टॉक' सेलेब्रिटी आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते आहेत. दुचाकीवर स्वार असलेल्या तीन अज्ञात इसमांनी मोहितची हत्या केली आहे. तब्बल पाच गोळ्या झाडून या 'टिक टॉक' चाहत्याची हत्या करण्यात आली आहे. मोहितच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित बहादूरगडचा रहिवाशी आहे. तो नेहमीप्रमाणे नजफगड येथे व्यायमशाळेत आला होता. ही माहिती घेऊन डाव साधत, आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडत त्याची हत्या केली. या घटनेप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.