सावधान! तुम्हीही Car ला लिंबू- मिरची, काळी बाहुली बांधताय का? आजच थांबवा नाहीतर....

वाहतूक पोलिसांनी सोमवारी एक अनोखा उपक्रम सुरु केला

Updated: Sep 15, 2021, 11:50 AM IST
सावधान! तुम्हीही Car ला लिंबू- मिरची, काळी बाहुली बांधताय का? आजच थांबवा नाहीतर....  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : वाहनांच्या वाढत्या दुर्घटना, प्रवासादरम्यान घडणारे अनुचित प्रकार या साऱ्या संकटांपासून वाचण्यासाठी अनेकदा लोकं वाहनांवर काळा धागा वगैरे बांधतात. पण, काही लोक मात्र गाडीची नंबर प्लेटच या धाग्यांच्या जीवावर टांगून ठेवतात. वाहतूक नियमांचं उल्लंघन करतेवेळी गाडीचा क्रमांक कोणाच्याही नजरेस पडू नये, यासाठी केलेली ही खुरापत. पण, असं करणाऱ्यांना आता चांगलाच धडा शिकवला जाणार आहे. 

दिल्ली वाहतूक पोलिसांनी सोमवारी एक अनोखा उपक्रम सुरु केला. ज्याअंतर्गत जाणूनबुजून वाहनांची नंबर प्लेट लिंबू - मिरची, काळा धागा, बाहुलीनं लपवल्यास अशा व्यक्तींकडून चलान कापण्यात येणार आहे. फक्त रस्त्यांवरच नव्हे, तर कॅमेऱ्यांमध्ये कैद वाहनांच्या फोटोंच्या माध्यमातूनही हे चलान कापण्यात येणार आहेत. ज्याअंतर्गत वाहनांच्या फोटोंच्या सहाय्यानं वाहन मालकाचा पत्ता शोधत थेट पोलिसच त्यांच्या दारी धडकणार आहेत. 

विशेष पोलीस आयुक्तांनी (वाहतूक) दिलेल्या माहितीनुसार नंबर ट्रेस करण्यासाठी अल्गोरिदम पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे, त्यामुळं घरी बसलेल्यांनाही दोषी आढळल्यास कारवाईचा सामना करावा लागणार आहे. डिफेक्टीव्ह नंबर सोबतच कोणत्याही वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्यासही त्यांच्याकडून चलान कापण्यात येईल. शिवाय त्यांच्या वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणीही करण्यात येणार आहे. 

माहितीसाठी, मोटर वेहिकल अॅक्टमध्ये नंबर प्लेटमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यासाठी 5 हजार रुपये दंड आकारल्या जाण्याची तरतूद आहे. तर, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्यास 5 हजार रुपयांचं चलान कापलं जाण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं तुम्हीही असं काही करत असल्यास सावधान!