धक्कादायक! विमानाच्या हायड्रॉलिक फ्लॅपमध्ये अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू

'या' विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या विमानात अपघात घडला.   

Updated: Jul 10, 2019, 10:40 AM IST
धक्कादायक! विमानाच्या हायड्रॉलिक फ्लॅपमध्ये अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू  title=

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी असणाऱ्या कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक प्रकार घडला. मंगळवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर १ वाजून  ४५ मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडला. ज्यामध्ये विमानाचं तांत्रिक काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 

संबंधित प्रकरणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित पांडे नामक कर्मचारी हा विमानाच्या लँडिंग गिअर दारापाशी अडकला. तो काही तांत्रिक कामाची पाहणी करत होता. 

वृत्तसंस्थेला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाईस जेट या कंपनीच्या बॉम्बार्डियर Q400 या विमानाचं काही तांत्रिक काम संबंधित कर्मचारी करत होता. त्याचवेळी अचानक लँडिंग दरवाजा आपोआप बंद झाला. परिणामी रोहित आत अडकला. अखेर त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू ओढावला. 

प्राथमिक तपासणीदरम्यान रोहितचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याची माहिती उघड झाली आहे. असं असलं तरीही सध्या या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु असून, कर्मचाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.  लवकरच या अपघाताची सविस्तर माहिती समोर येईल.