नवी दिल्ली : काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत होता. ज्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून Baba Ka Dhaba बाबा का ढाबा आणि या ढाब्याचे मालक कांता प्रसाद हेच अनेक चर्चांचा विषय़ ठरले. पण, प्रसिद्धिझोतात आल्यानंतर आता याच कांता प्रसाद यांनी गौरव वासन या युट्यूबरनं आपली फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर लावला. ज्यावर आता खुद्द गौरवनंच मौन सोडत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
सर्व आरोप खोटे...
आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगत बाबांना सर्व पैसे देण्यात आले आसल्याचं त्यानं सांगितलं. 'माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. बाबाच्या नावे आम्हाला जे पैसे मिळाले ते आम्ही त्यांनाच दिले. आम्हाला चेकच्या माध्यमातून २३३००० रुपये, NEFT च्या माध्यमातून १ लाख रुपये आणि पेटीएमच्या माध्यमातून ४५००० रुपये मिळाले.
२५ लाख रुपये मिळण्याची बाब खोटी...
बाबा आणि आणखीही काही ठिकाणही आम्हाला २५ लाख रुपये मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. पण ते खरं नाही. बाबांना कोणीतरी यासाठी उद्युक्त केलं आहे, असं गौरवचं म्हणणं आहे. किंबहुना आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी बँक खात्याचा तपशीलही त्यानं समोर आल्याचा खुलासा केला.
'बाबा का ढाबा' प्रकरणाला वेगळ वळण मिळालं. ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर आणि यूट्यूबर गौरव वासनविरोधात पैशांचा घोटाळा केल्याची तक्रार दाखल केली होती. कांता प्रसाद यांना पैसे देण्याचे आवाहन गौरवनं केल्याचं म्हटलं गेलं. पण गौरवनं कांता प्रसाद यांचा अकाऊंट नंबर न देता स्वत:चा अकाऊंट नंबर दिला होता. याच प्रकरणात घोटाळा झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. ज्याबाबत आता गौरवचं स्पष्टीकरण समोर आलं आहे.