नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली समाजवादी पक्षातील यादवी इतक्यात थांबण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. कदाचीत समाजवाद्यांचे जहाज फुटीच्या खडकावर आदळूनच यादवी संपण्याची शक्यता वाढली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही शक्यता अधिकच गडद होत चालली आहे. यंदाच्या नवरात्रातच उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला धक्का बसण्याची चिन्हे असून, हा धक्का दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडून नाही तर, त्यांचे वडील मुलायम सिंह यादव यांच्याकडूनच मिळण्याची शक्याता आहे. मुलायम सिंह यादव हे आपले बंधू शिवपाल यादव यांच्यासोबत नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
सूत्रांकडील माहितीनुसार,येत्या ५ ऑक्टोबरला आगरा येथे मुलायम सिंह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनातच मुलायम नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात मुलायम सिंह यांची पक्षाध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली २३ सप्टेबरला लखनऊ येथे समाजवादी पक्षाचे अधिवेश होणार आहे. तर, मुलायम सिंह यांच्या नेतृत्वाखाली आगरा येथे ५ ऑक्टोबरला अधिवेशन पार पडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या अधिवेशनाच्या होर्डींग्जवर मुलायमसिंह यादव यांचे छायाचित्र असणार नाही.