"माझ्या बहिणीशीही लग्न करावं लागेल," नवरीमुलीने धरला हट्ट; अट ऐकून नातेवाईकही चक्रावले

दोन सख्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न (Marriage) केल्याची अजब घटना समोर आली आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी पाहुणे आलेले असतानाच मोठ्या मुलीने आपली छोटी बहिणही आपल्यासोबत येईल अशी अट ठेवली. यानंतर सगळेच पाहुणे गोंधळले होते.   

शिवराज यादव | Updated: May 15, 2023, 01:56 PM IST
"माझ्या बहिणीशीही लग्न करावं लागेल," नवरीमुलीने धरला हट्ट; अट ऐकून नातेवाईकही चक्रावले title=

Viral News: लग्न म्हटलं तर आपण आयुष्यभराचा जोडीदार ठरवताना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक निवडतो. त्याच्या दिसण्यापासून ते शिक्षण, नोकरीपर्यंत सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. मुलींना तर लग्न करुन जाताना आपलं घर, आई, वडील सगळंच मागे सोडून नव्याने सुरुवात करावी लागते. ज्यांना आयुष्यभर जीव लावला ते भाऊ, बहिण यांच्यापासूनही त्यांना वेगळं व्हावं लागतं. पण राजस्थानमध्येमध्ये एक असं लग्न पार पडलं आहे जिथे बहिणीला दूर करु शकत नाही म्हणून तरुणीने तिलाही आपण निवडलेल्या तरुणाशी लग्न करायला लावलं. या अजब लग्नाची एकच चर्चा सुरु आहे. 

टोंक जिल्ह्यात एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केलं आहे. हरिओम मीना असं या तरुणाचं नाव असून, सगळीकडे त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, या लग्नाच्या रितसर पत्रिका छापण्यात आल्या होत्या. या लग्नाला सर्व कुटुंबीय, मित्र आणि लोक उपस्थित होते. 

हरिओम मीनाचे कुटुंबीय त्याचं लग्न करण्यासाठी मुलगी शोधत होते. यावेळी सीदडा गावातील बाबूलाल मीना यांची मोठी मुलगी कांता हिचं स्थळ त्यांच्याकडे आलं. यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाची चर्चा सुरु झाली. हरिओमचं कुटुंब मीनाच्या घरी गेलं असता त्यांनी अशी अट ठेवली जी ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. 

कांताने यावेळी आपली छोट्या बहिणीची मानसिक स्थिती योग्य नसून आपलं तिच्यावर फार प्रेम असल्याचं सांगितलं. तसंच जो तरुण आम्ही दोघी बहिणींशी लग्न करण्यास तयार होईल त्यालाच होकार देऊ असंही तिने सांगितल. कांताची ही अट ऐकून हरिओमचं कुटुंबीय गोंधळलं होतं. पण नंतर जेव्हा कांताने बहिणीप्रती असणारं आपलं प्रेम व्यक्त करत आयुष्यभर तिची काळजी घेणार असल्याचं सांगितलं तेव्हा अखेर ते तयार झाले. 

5 मे रोजी पार पडलेल्या या लग्नाच्या पत्रिका छापण्यात आल्या होत्या. धूमधडाक्यात हे लग्न करण्यात आलं. लग्नमंडपात एकाच वेळी दोन बहिणी विवाहबंधनात अडकत असल्याने पाहुणेही आश्चर्याने पाहत होते. दोन्ही बहिणींनी लग्नानंतर एकाच वेळी गृहप्रवेश केला. 

हरिओम स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असून त्याची पत्नी कांता उर्दूमध्ये बीएड आहे. तर कांताची छोटी बहिण मानसिक स्थिती योग्य नसल्याने फक्त 8 वी पर्यंत शिकली आहे. "आपण जेव्हा लग्न करण्याची तयारी दर्शवली  तेव्हा सगळे चर्चा करु लागले होते. अनेकांनी मला विचार करुन निर्णय घेण्याचा सल्ला दिला. तर काहींनी माझी खिल्ली उडवली. पण आता मात्र हरिओम आणि त्याच्या कुटुंबाचं कौतुक होत आहे," असं हरिओमने सांगितलं आहे.