लोकसभा निवडणुकीपूर्वीच विजय मल्ल्या भारतात, सरकारची नवी रणनिती

२०१६ मध्ये विजय मल्ल्या देश सोडून पळाला होता आणि ब्रिटनमध्ये गेला होता. तेव्हापासून त्याला भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

Updated: Jan 8, 2019, 10:53 AM IST
लोकसभा निवडणुकीपूर्वीच विजय मल्ल्या भारतात, सरकारची नवी रणनिती title=

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या हातात कोणताही मुद्दा राहू नये, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी आणि मद्यव्यावसायिक विजय मल्ल्या याला लोकसभा निवडणुकीपूर्वीच भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी राजनैतिक पातळीवर ब्रिटनशी चर्चा सुरू असून, मल्ल्या लवकरच भारतात परतलेला असेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. भारतातील बॅंकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या परदेशात फरार झाला आहे. गेल्याच महिन्यात वेस्टमिनिस्टरमधील न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. त्यानंतर त्याला भारतात आणले जाण्याबद्दलची शक्यता वाढली आहे. 

२०१६ मध्ये विजय मल्ल्या देश सोडून पळाला होता आणि ब्रिटनमध्ये गेला होता. तेव्हापासून त्याला भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पण डिसेंबर २०१८ मध्ये वेस्टमिनिस्टरमधील न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. त्यामुळे मल्ल्या भारतात येण्याचा मार्ग सुकर झाला होता. अर्थात या निर्णयाविरोधात ब्रिटनमधील वरिष्ठ न्यायालयात अर्ज करण्याचा पर्याय मल्ल्यापुढे आहे. पण त्याच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेतली जावी आणि त्याला लवकरात लवकर भारतीय तपास पथकाच्या हवाली करण्यात यावे, यासाठी भारताचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.

पाच जानेवारीला मुंबईमधील न्यायालयाने विजय मल्ल्याला आर्थिक गुन्हे कायदा २०१८ नुसार फरारी घोषित केले. त्यामुळे याच कायद्याचा आधार घेत विजय मल्ल्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सर्व काही सुरळीत घडले, तर लोकसभा निवडणुकीच्या आधीच मल्ल्याला भारतात आणले जाईल.