CJI चंद्रचूड यांना पदेश दौऱ्यात विचारलेला 1 प्रश्न अन् सुप्रीम कोर्टात झाला 'तो' मोठा बदल

Supreme Court Bench Chair CJI Chandrachud: सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झालं तेव्हा मोठे बदल करण्यात आल्याचं दिसून आलं. हे बदल सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी दिलेल्या निर्देशांनुसार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 13, 2023, 01:11 PM IST
CJI चंद्रचूड यांना पदेश दौऱ्यात विचारलेला 1 प्रश्न अन् सुप्रीम कोर्टात झाला 'तो' मोठा बदल title=
सरन्यायाधीशांनी केलेल्या सुचनेनुसार करण्यात आला बदल

Supreme Court Bench Chair CJI Chandrachud: काही दिवसांपूर्वीच परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांना एका कार्यक्रमामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला. उपस्थितांपैकी एका व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नानंतर चंद्रचूड यांनी तातडीने आदेश देऊन सुप्रीम कोर्टामधील न्यायाधीशांच्या आसनव्यवस्थेमध्ये मोठा बदल करुन घेतला आहे. प्रेक्षकांपैकी एकाने विचारलेल्या प्रश्नामुळे चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांच्या खुर्चांची उंची समान असेल यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. आता सुप्रीम कोर्टातील न्यायाधिशांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि कम्फर्टप्रमाणे खुर्च्यांची उंची आणि इतर गोष्टींमध्ये बदल करता येईल. सुप्रीम कोर्टामधील रचनेमध्ये करण्यात आलेल्या काही मूलभूत बदलांमध्ये खुर्चांसंदर्भातील हा बदलही आहे. नवीन रचनेमध्ये कोर्टात डिजिटल तंत्रज्ञानाचाही समावेश केला जाणार आहे.

नेमका काय प्रश्न सरन्यायाधीश चंद्रचूड यांना विचारण्यात आला

सुप्रीम कोर्टातील रजिस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या माहितीनुसार, मागील बऱ्याच काळापासून न्यायाधिशांना त्यांच्या खुर्च्यांची सेटींग बदलता यावी यासाठी मागणी केली जात होती. आपल्या सुविधेनुसार बदल करता येणाऱ्या खुर्च्या हव्यात असं सांगितलं जात होतं. मात्र खंडपीठाची आसनव्यवस्था असलेल्या न्यायाधीशांच्या खुर्च्यांच्या उंचीने कधीच अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं नव्हतं. सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान 21 मे ते 2 जुलैदरम्यान ब्रिटनमधील एका कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं लक्ष या खुर्च्यांच्या उंचीकडे वेधण्यात आलं. 'खंडपीठातील खुर्च्यांची उंची वेगवेगळी का असते हे तुम्ही मला सांगू शकाल का?' असा प्रश्न एका व्यक्तीने चंद्रचूड यांनी विचारला. ही व्यक्ती ऑनलाइन माध्यमातून भारतातील सुनावण्या ऐकायची. त्यावेळी खुर्च्यांच्या उंचीची गोष्ट या व्यक्तीच्या लक्षात आली.

चंद्रचूड यांनी काय उत्तर दिलं?

खुर्च्यांची उंची वेगवेगळी यासाठी आहे कारण वेगवेगळे न्यायाधीश वेगवेगळ्या वेळी त्यांच्या खुर्च्यांमध्ये बदल करुन घेतात. दिर्घकाळ काम सुरु असल्याने पाठीसंदर्भातील आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने या खुर्च्या बदलल्या जातात, असं उत्तर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिलं. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हा प्रश्न लक्षात ठेवत भारतात आल्यानंतर आपल्या स्टाफला ही गोष्ट सांगितली. हा एक योग्य प्रश्न होता याबद्दल चंद्रचूड यांना काहीच शंका नव्हती. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टातील अधिकाऱ्यांना खुर्च्यांसंदर्भात निर्देश दिले. खांदे, मान, पाठ आणि पोटऱ्यांना आरामदायक वाटतील अशा आणि हव्या त्याप्रमाणे अॅडजेस्ट करता येतील अशा खु्र्च्या हव्यात असं सांगितलं. तसेच एकाच स्तरावर सर्व खुर्च्यांची उंची असावी असंही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलं.

अनेक दशकांपासूनच्या खुर्च्या

उन्हाळी सुट्ट्यांनंतर सुप्रीम कोर्टाचं कामकाज पुन्हा सुरु झालं तेव्हा सरन्यायाधीशांनी दिलेल्या निर्देशांचं पालन करण्यात आलं. सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांच्या खुर्च्यांची उंची समान करुन घेण्यात आली. पाठ आणि खांद्याला आमरामदायक आणि अधिक सपोर्ट मिळेल असे बदल करुन घेण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमधील अधिकाऱ्यांनी या खुर्च्या किमान काही दशकांपूर्वीच्या होत्या असं सांगितलं. मात्र नेमक्या कधी या खुर्च्या विकत घेण्यात आल्या हे त्यांना सांगता आलं नाही. पारंपारिक डिझाइन कायम ठेवण्याच्या उद्देशाने या खुर्च्यांची मूळ रचना कधीच बदलम्यात आली नव्हती. मात्र न्यायाधिशांच्या आवडीनिवडी आणि सोयीनुसार त्यात वेळोवेळी बदल नक्की करण्यात आले.

अनेकजण करुन घेतात बदल

सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमधील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार माजी सरन्यायाधीश ए. व्ही. रमणा यांनी त्यांच्या खुर्चीमध्ये ऑर्थोपॅडिक गरजांनुसार बदल करुन घेतला होता. विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही वर्षांपूर्वी असाच बदल केला होता जेव्हा त्यांना पाठीचा त्रास जाणवू लागला होता. मात्र खुर्च्यांसंदर्भातील सर्व समस्या सुटल्याचं चित्र दिसत नाही. 2 ऑगस्ट रोजी संविधानातील अनुच्छेद 370 मध्ये करण्यात आलेल्या बदलांसंदर्भातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश सूर्यकांत हे आपल्या ऑफिसमधील एका छोट्या खुर्चीवर बसल्याचं पहायला मिळालं.