लखनऊ: कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाल्याने बेरोजगार झालेले अनेक मजूर पायी आपल्या गावांकडे परतत आहेत. मात्र, यावरून सध्या उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यात लेटरवॉर सुरु आहे. पायी चालत असणाऱ्या मजुरांसाठी काँग्रेसने १००० बसेसची व्यवस्था केल्याचे प्रियंका गांधींकडून सांगण्यात आले होते. या बसेसना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली होती. यावरून बराच काळ राजकारण सुरु होते. प्रियंका गांधी यांनी योगी सरकार आपली मागणी मान्य करत नसल्याचे म्हटले होते.
अखेर योगी सरकारने या प्रस्तावाला मान्यता देत प्रियंका गांधी यांच्याकडे या १००० बसेसचा तपशील मागवला होता. उत्तर प्रदेशचे अप्पर मुख्य सचिव अवनीश कुमार यांनी प्रियंका यांना पत्र लिहून १००० बसेसची यादी देण्याची विनंती केली. यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा प्रियंका गांधी यांचे खासगी सचिव संदीप सिंह यांनी योगी सरकारला पत्र धाडले. तुम्ही आम्हाला नोएडा आणि गाझियाबादमध्ये बसेस घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र, आम्ही तीन तास उलटले तरी उत्तर प्रदेशच्या सीमेवर अडकून पडलो आहोत. आग्रा प्रशासन आम्हाला उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी देत नाही, असे या पत्रात म्हटले होते. हे पत्र अवनीश कुमार अवस्थी यांनाच पाठवण्यात आले होते.
यानंतर काहीच हालचाल न झाल्याने दुपारच्या सुमारास प्रियंका गांधी यांनी योगी प्रशासनाला पुन्हा पत्र पाठवले. ही वेळ संवेदनशीलपणे वागण्याची आहे, हे आम्ही तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो. त्यामुळे तुम्ही आमच्या बसेसना उत्तर प्रदेशमध्ये येण्याची परवानगी द्यावी, असे या पत्रात म्हटले होते. उत्तर प्रदेशातील हे लेटरवॉर सध्या चांगलेच गाजत आहे.
दरम्यान, योगी सरकारने काँग्रेसने मजुरांसाठी १००० बसची व्यवस्था केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. काँग्रेसने दिलेल्या १००० बसच्या यादीत वाहनांचे क्रमांक आहेत. मात्र, हे क्रमांक तपासले असता यापैकी अनेक गाड्या बस नसून बाईक, कार आणि रिक्षा असल्याचे निदर्शनास आल्याचे योगी सरकारचे म्हणणे आहे.