Brother want Marry Sister: भावा बहिणीच्या पवित्र नात्याचे उदाहरण अनेकदा दिले जाते. पण नात्याला काळीमा फासण्याचे काम एका भावाने केले आहे. या भावाचा आपल्या बहिणीवरच जीव जडला. त्याच प्रेम इतकं वाढत गेलं की लग्न बहिणीशीच करणार या निर्णयापर्यंत तो जाऊन पोहोचला. त्याला विरोध केल्यानंतर गळा कापण्यापर्यंत त्याची मजल केली. काय आहे ही घटना? भावा-बहिणीच्या नात्याचं पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने भावा-बहिणीचे नाते कलंकित केले. लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने आपल्या चुलत बहिणीच्या गळ्यावरुन चाकू फिरवला. पीडित तरुणी ही आरोपीच्या मावशीची मुलगी आहे. आरोपीने तिच्या गळ्यावर वार करत तिला गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत विद्यार्थिनीला राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या डीएम कॉलनीत घडली. 25 वर्षांची पीडित तरुणी ही कोतवाली भागातील डीएम कॉलनीत तिच्या मामाच्या घरी राहत होती. येथे ती एलएलबीचे (कायद्या) शिक्षण घेत होती. दरम्यान 26 वर्षीय ज्ञान प्रकाश याने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तिच्या मानेवर चाकूने वार करत तिला जखमी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडित मुलगी जालौन जिल्ह्यातील रहिवासी आहे. हल्ल्यानंतर मुलीला गंभीर अवस्थेत बांदा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली असून, तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुलगी आणि तिचा चुलत भाऊ ज्ञान प्रकाश एकाच कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतात. दोघेही एलएलबीच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत. चुलत भावाच्या मनात प्रेम कधी फुलले हे पीडित विद्यार्थिनीला कळलेच नाही. अचानक भावाने तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. रागाच्या भरात ज्ञानप्रकाश याने विद्यार्थीनीच्या मानेवर चाकूने वार केले. विद्यार्थीनी रक्तबंबाळ होऊन खाली पडली. हे पाहताच ज्ञानप्रकाशने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
आरोपी ज्ञान प्रकाशला मुलीशी लग्न करायचे होते पण मुलीने नकार दिला. यानंतर रागाच्या भरात आरोपीने ही घटना घडवून आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.