Constable leave: अनेकदा कर्मचारी आपल्या बॉसकडे घरगुती गंभीर कारणासाठी सुट्टी मागतात. पण काही कारणामुळे ती मिळत नाही. याचा काय परिणाम होऊ शकतो, हा अंदाज न लावलेला बरा. उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील रामपुरा ठाण्याच्या प्रभारीने मनमानी केल्याने एका शिपायाल सुट्टी मिळाली नाही. प्रेग्नेंट पत्नीवर उपचारासाठी हा शिपाई 1 महिन्यापासून सुट्टी मागत होता. पण त्याला सुट्टी काही दिली जात नव्हती. दरम्यान उपचारादरम्यान पत्नी आणि नवजात बाळाचा जीव गेला. दोघांना मृतावस्थेत पाहून शिपाई बेशुद्ध पडला.
शिपाई विकास निर्मल हे रामपुरा ठाण्यात कामाला आहेत. त्यांची पत्नी ज्योती ही मुंबईमध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये कॉन्स्टेबल होती. पत्नी गर्भवती असल्याने ती गावी घरच्यांसोबत राहत होती. डिलीव्हरीची तारीख जवळ येत चालली होती. त्यामुळे विकास गेल्या 1 महिन्यांपासून सुट्टी मागत होता. त्याने 4 वेळा लेखी अर्ज केला पण त्याला सुट्टी काही देण्यात आली नाही.
शनिवारी विकासच्या पत्नीची तब्येत बिघडली. यातच पत्नी आणि नवजात शिशूचा मृत्यू झाला. घरातून ही बातमी कळताच विकास जीवाच्या आकांताने ओरडू लागला, रडू लागला. विकासबद्दल संवेदना दाखवण्यासाठी प्रभारी आपल्या गाडीने त्याला त्याच्या गावी घेऊन गेले पण विकाससाठी सर्वकाही संपलं होतं.
शिपाईची पत्नी आणि नवजात बाळाच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ माजली आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. शिपाई विकासने ठाणे प्रभारी अर्जुन सिंह यांना सुट्टीसाठी विनंती अर्ज केले पण ते मान्य करण्यात आले नाहीत. या प्रकरणात ठाणे प्रभारी दोषी आढळला असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे एएसपी असीम चौधरी यांनी सांगितले.
पोलीस विभागाने विकासला आता एका महिन्याची सुट्टी दिली आहे. पण आता ही सुट्टी काय कामाची असा प्रश्न विकास विचारतोय. पत्नीचा नववा महिना सुरु होता, तेव्हापासून सुट्टी मागत होतो पण दिली नाही, असे त्याने सांगितले.
मला माफ करा
या घटनेनंतर विकासने सोशल मीडियात संवेदनशील पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने आपली पत्नी आणि बाळाची माफी मागितली आहे. मला माफ करा, मी काही करु शकलो नाही. तो स्वत:चे अश्रू आवरु शकला नाही. विकाससोबत खूप चुकीचे झाले असे त्याच्या सहकर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.