Crime News : सासू सुनेचं भांडण हे कोणाला नवं नाही. पण काहीवेळा हा वाद इतका टोकाला जातो की त्या एकमेकांच्या जीवावर उठतात. असाच काहीसा प्रकार नोएडात (Noida Crime) घडलाय. उत्तर प्रदेशच्या (UP News) नोएडात एका सासूने शार्प शूटरला सांगून तिच्या सूनेची हत्या केली आहे. पोलिसांनी जेव्हा आरोपींना अटक केली तेव्हा या प्रकरणाचा उलघडा झाला आणि सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी (UP Police) या प्रकरणात आरोपींसह महिलेच्या सासूला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासूने सुनेची हत्या करण्यासाठी आरोपींना एक लाख रुपयांची सुपारी दिली होती.
हत्या झालेली 27 वर्षीय सोनी ग्रेटर नोएडातील बदलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छपरौला गावात तिच्या पतीसोबत राहत होती. सोनीने पहिल्या पतीला सोडून दुसरे लग्न केले होते. 5 सप्टेंबर रोजी दुपारी बाईकवरून आलेल्या दोघांनी घरात घुसून सोनीवर गोळ्या झाडल्या होत्या. अचानक झालेल्या या गोळीबाराने तिलाही प्रतिकार करता आला नाही. या हल्ल्यात सोनीचा जागीच मृत्यू झाला होता. सोनीच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. पोलिसांना तपासात सोनीच्या दोन्ही लग्नांची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी प्रेमप्रकरणाच्या दिशेने तपास सुरु केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशी घेतली. चौकशीअंती आरोपींनी गुन्हा कबुल केला आणि घटनाक्रम सांगितला. मात्र हे सगळं ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
आरोपींनी प्रेमप्रकरणातून नव्हे तर सासूने दिलेल्या सुपारीनंतर सोनीची हत्या केल्याचे सांगितले. सोनीला मारण्यासाठी तिच्या सासूने एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. यानंतर पोलिसांनी सोनीची सासू गीता देवी हिला अटक केली. पोलिसांनी गीता देवीकडे चौकशी केली असता सांगितले की, मुलगा सोनीसोबत लग्न झाल्यापासून कुटुंबाकडे लक्ष देत नव्हता. लग्नानंतर मुलाने आर्थिक मदत करणे बंद केले. तसेच सोनीसुद्धा कुटुंबियांना विचारत नव्हती. सोनीसोबत लग्न केल्याने ती कुणालाच पसंत नव्हती. त्यामुळे शार्प शूटरला एक लाखांची सुपारी देऊन तिची हत्या केली.
दरम्यान, पोलिसांनी सोनीचा खून करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हत्येनंतर आरोपी सचिनने पोलिसांना सांगितले की, त्याने हे पिस्तूल दुरियाई गिरधरपूर रोडवरील बंबाजवळ झुडपात लपवून ठेवले होते. पोलीस आरोपीला घेऊन जेव्हा पिस्तुल ताब्यात घेण्यासाठी गेले तेव्हा सचिनने पोलिसांची बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिस आणि सचिनमध्ये चकमक झाली. यामध्ये सचिन पोलिसांच्या गोळ्या लागल्याने जखमी झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.