शिक्षकाचा कारनामा! फॉर्म भरण्याच्या बहाण्यानं बनवलं विद्यार्थिनीचं लग्नाचं प्रमाणपत्र, तिच्या घरी गेला अन्...

UP Crime : उत्तर प्रदेशात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा एका दिवसाने विवाह होणार होता. मात्र शिक्षकाच्या या कृत्याने मुलीच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 13, 2023, 01:10 PM IST
शिक्षकाचा कारनामा! फॉर्म भरण्याच्या बहाण्यानं बनवलं विद्यार्थिनीचं लग्नाचं प्रमाणपत्र, तिच्या घरी गेला अन्... title=
(फोटो सौजन्य - freepik.com)

UP Crime : आपण याआधी शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केला अशा बातम्या वाचल्या असतील. पण उत्तर प्रदेशात (UP News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं एका शिक्षकाने विद्यार्थीनीसोबत जबरदस्तीने विवाह करण्याचा प्रयत्न केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे विद्यार्थिनीचा विवाहसुद्धा थांबवण्याचा प्रयत्न या शिक्षकाने केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात (UP Police) तक्रार नोंदवली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

घरी जाऊन शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाने त्याचे आणि त्याच्या विद्यार्थिनीचे  बनावट विवाह प्रमाणपत्र बनवले. एवढ्यावरच न थांबता हा शिक्षकाने मुलीच्या विवाहाच्या आठवडाभरापूर्वी तिला पाहण्यासाठी तो तिच्या घरी पोहोचला आणि त्याने त्याचा कारनामा दाखवला. हा सर्व प्रकार पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. आधीपासूनच विवाहित असलेल्या या शिक्षकाचे हे कृत्य पाहून विद्यार्थीनीचे भाऊ संतापले. मुलीच्या वडिलांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, "मुलीचे लग्न 14 जून 2023 रोजी होणार होते. आरोपी सद्दामचे आधीच लग्न झालेले होते. यापूर्वीही त्याने दोन विवाह केले होते. आता त्याच्यासोबत त्याची पत्नी राहते. तो माझ्या मुलीला शिकवणी द्यायचा. ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या नावाखाली मुलीचे आधारकार्ड घेऊन त्याने बनावट विवाह प्रमाणपत्र तयार करून घेतले. माझ्या मुलीचे लग्न ठरले असून याची माहिती मिळताच सद्दाम विवाह प्रमाणपत्र घेऊन घरी पोहोचला होता. याच बनावट प्रमाणपत्राच्या आधारे तो मुलीवर लग्न करण्यासाठी दबाव आणत होता. दुसरीकडे माझ्या मुलीच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. पण सद्दामच्या या कृत्यानंतर मुलाकडच्यांनी आमच्यासोबतचे संबंध तोडले."

सद्दामच्या पत्नीनेही नोंदवला गुन्हा

रामगढताल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारगो मौलवी चौकात राहणारी सद्दाम हुसेनची पत्नी नाझिया निजाम हिने मुलीचे वडील आणि भावासह 20 ते 25 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विवाहाच्या मुद्द्यावरून मुलीचे वडील आणि त्यांचा मुलगा 20-25 अज्ञात लोकांनी माझ्या घरात दरवाजा तोडून घुसण्याचा प्रयत्न केला असा आरोप नाझियाने केला आहे. त्यांनी माझ्या पतीला लाठ्या-काठ्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मी त्यांना वाचवायला गेले तर त्यांनी मलाही मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे नाझियाने सांगितले. पोलिसांनी याप्रकरणई घरात घुसून मारहाण, तोडफोड, धमक्या यासह अन्य कलमान्वये सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.