UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) मुरादाबादमध्ये एका 33 वर्षीय गॅस वेल्डरची त्याच्याच लहान भावाने बेदम मारहाण करून हत्या केली आहे. या हत्येमुळे मुरादाबामध्ये खळबळ उडाली आहे. मात्र हत्येपेक्षा त्याच्या कारणाचीच जास्त चर्चा सुरु आहे. घरातील बाथरूममध्ये आधी आंघोळ (Bath) कोण करणार यावरूनच हा किरकोळ वाद सुरू झाला होता. याच वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली. लहान भावाच्या हल्ल्यात मोठ्या भावाची पत्नी आणि तीन मुलीदेखील जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी (UP Police) याप्रकरणी आरोपी भावाला अटक केली आहे.
फकीर हुसेन असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे. तर शादाब असे आरोपी भावाचे नाव आहे. हत्येनंतर 30 वर्षीय शादाब स्वतःच पोलीस ठाण्यात गेला होता आणि भावाच्या खुनाची कबुली दिली. आपणच लाकडाच्या तुकड्याने फकीर हुसेनचा खून केल्याचा दावा शादाबने केला. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी शादाबला ताब्यात घेत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत फकीर हुसेन आणि त्याचे पाच भाऊ हे एका दुमजली घरात राहत होते.
"एका छोट्या शुल्लक वादातून इतके टोकाचे पाऊल उचलले गेले आहे. तपासादरम्यान पोलिसांना तळमजल्यावरील भिंतींवर रक्ताचे डाग दिसले. इथे मृत व्यक्ती आणि त्याची पत्नी त्यांच्या तीन मुलींसह राहत होता. पाचही भाऊ पहिल्या मजल्यावर राहतात. याप्रकरणी शादाब आणि साजिद यांना अटक केली आहे. तर इतर तीन जणांना या प्रकरणात आरोपी बनवले आहे," अशी माहिती मुरादाबाद शहराचे पोलीस अधीक्षक अखिलेश भदोरिया यांनी दिली. तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. यासोबत हत्येचे हत्यार जप्त करण्यात आले आहे.
मृत फकीर हुसेनची पत्नी नसीम जहाँच्या म्हणण्यानुसार,11 वाजता तिची मुलगी आंघोळीसाठी जात होती. त्यावेळी साजिदच्या पत्नीने तिला आधी बाथरूमला जायचे असल्याने थांबण्यास सांगितले. शादाब आणि साजिद पहिल्या मजल्यावरून खाली आल्यावर प्रकरण आणखी बिघडले. यानंतर दोघांनी मुलीला आणि कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
"त्यांनी माझ्या पतीला आणि तीन मुलींना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वाद वाढताच त्यांनी माझ्या पतीला लाकडी तुकड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मी मारु नका असे म्हणून मध्ये पडल्यावर त्यांनी मलाही मारले. त्यानंतर, माझ्या पतीच्या भावांनी माझ्या मुलींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कसे तरी घरातून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. मात्र त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत, असे नसीम जहाँने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी नसीम जहाँचा भाऊ रियासत अली याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काही महिन्यांपूर्वी फकीरच्या भावांनी त्याच्यावर चाकूने वार केले होते, परंतु हे प्रकरण कुटुंबातच मिटले होते, असेही समोर आले आहे.