माहितीच्या अधिकाराने हे देखील गूढ उकलण्यास मदत, बायकोच निघाली सावत्र आई...

लग्नाचं वचन आणि आयुष्यभर साथ निभावण्याचं अग्निला साक्षी मानूनं दिलेलं वचन पत्नी विसरली आणि चक्क सासऱ्यासोबत फरार झाली.

Updated: Jul 4, 2021, 07:12 PM IST
माहितीच्या अधिकाराने हे देखील गूढ उकलण्यास मदत, बायकोच निघाली सावत्र आई...

मुंबई: लग्नाचं वचन आणि आयुष्यभर साथ निभावण्याचं अग्निला साक्षी मानूनं दिलेलं वचन पत्नी विसरली आणि चक्क सासऱ्यासोबत फरार झाली. लग्नानंतर 6 महिन्यांत पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादामुळे पत्नी रागाच्या भरात माहेरी गेली. तर इथे सासरा म्हणजेच तरुणाचे वडील घरातून अचानक गायब झाले. नेमका काय प्रकार आहे हे समजेना. वडिलांना शोधण्याचे प्रयत्न मुलाने सुरू केले आणि धक्कादायक सत्य समोर आलं. 

तरुणी आणि युवकाचं 2016 मध्ये अल्पवयीन असताना या दोघांचा विवाह झाला होता. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून त्यांच्यात वादावादी सुरू झाल्यामुळे पत्नीनं थेट माहेर गाठलं. इथे परिस्थिती निवळली नव्हती. वडिलांच्या खात्यातून सॅलरी येणं बंद झालं. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या. त्या पाठोपाठ वडील गायब होणं हे थोडं विचित्र वाटणारं होतं.

आपल्या वडिलांना काही झालं का? या विवंचनेत मुलाने वडिलांना शोधायचं ठरवलं. शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले. अखेर वडिलांच्या सॅलरीची माहिती मिळवण्यासाठी त्याने माहिती अधिकार (RTI)चा वापर केला. माहिती अधिकारातून जी माहिती समोर आली त्यानंतर युवकाच्या पायाखालची जमीनच सरकली. 

वडिलांच्या खात्यातून दर महिन्याला पैसे काढले जात होते. मात्र हे पैसे घरी येत नव्हते. त्यावरून युवकाने वडिलांचा शोध घेतला. या युवकाची पत्नी आणि त्याचे वडील दोघंही एकत्र असल्याचं सत्य त्याच्या समोर आलं. 

युवकाच्या पत्नीने त्याच्याच 48 वर्षांच्या वडिलांसोबत लग्न केलं. आपलीच पत्नी आपली आई बनल्याचं सत्य एका RTIमधून समोर आलं आणि युवकाला मोठा धक्का बसला. संतापलेल्या युवकाने आपल्या सावत्र आई म्हणजेच स्वत:च्या पत्नी आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी दखल घेऊन चौकशी केली. मात्र दोघांनीही आपण एकमेकांसोबत खूश असल्याचं सांगितल्याने पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बदायूं इथे घडल्याचं सांगण्यात आलं आहे. 

या परिसरातील सर्कल ऑफिसर विनय चौहान यांच्या म्हणण्यानुसार, 'तरूण आपल्या लग्नाचा कोणताही पुरावा दाखवू शकला नाही. असं असलं तरी, लहान वयातच लग्न करणे कायद्याच्या दृष्टीने वैध नाही. म्हणून या प्रकरणात गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही. सध्या दोन्ही पक्ष परस्पर चर्चेद्वारे हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी दोन्ही पक्षांना पुढील समुपदेशनासाठी पुन्हा बोलविण्यात आल्याचंही सांगितलं आहे.