Gautam Adani Hindenburg Report: गतवर्षी 2022 मध्ये जगातील श्रीमंतांच्या यादीत सहभागी असणारे भारतीय उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांची यावर्षाची सुरुवात चांगली झालेली नाही. पहिल्याच महिन्यात अमेरिकेतून एक रिसर्च रिपोर्ट समोर आला असून याचा 60 वर्षीय गौतम अदानी यांच्या उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. अदानी यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. अदानी यांनी इतकी संपत्ती (Gautam Adani Net Worth) गमावली आहे की, सध्या अर्थव्यवस्था ढासळल्याने गटांगळ्या खाणाऱ्या पाकिस्तानमधील (Pakistan) लोकांनी तब्बल आठ महिने बसून खाल्लं असतं.
अमेरिकेतील रिसर्च संस्था हिंडनबर्गने (Hindenburg) 24 जानेवारी 2023 ला एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात अदानी ग्रुपसंबंधी 88 प्रश्न विचारण्यात आले असून, कर्जासंबंधीही काही दावे करण्यात आले आहेत. याचा परिणाम अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सवर झाला असून ते कोसळले आहेत. अदानींच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे बाँड आणि शेअर्समध्ये घसरण झाली आहे. शुक्रवारी Adani Green Energy आणि Adani Total Gas च्या शेअर्समध्ये तब्बल 20 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, Adani Group मध्ये सामील सर्व कंपन्यांचे शेअर्स वारंवार घसरत आहेत. यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. बिलेनियर्स इंडेक्सची आकडेवारी पाहिल्यास, अदानी ग्रुपच्या कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप (Adani Group Market Cap) फक्त सहा तासांच्या कामाकाजात 50 अरब डॉलर म्हणजेच 4 लाख कोटींपेक्षा कमी झालं. याचा थेट परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवर झाला असून जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावरुन थेट सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
ब्लूमबर्ग गेल्या एक दशकापासून आशियातील सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्या उद्योजकांचा डेटा जतन करत असून गौतम अदानी यांचं नाव यात समाविष्ट झालं आहे. गौतम अदानी यांनी एका दिवसात 20.8 अरब डॉलर इतकी संपत्ती गमावली आहे. यासह गौतम अदानी उद्योजकांच्या त्या यादीत सहभागी झाले आहेत, ज्यांनी एका दिवसात सर्वाधिक संपत्ती गमावली आहे.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या दोन दिवसांत 2.11 लाख कोटीची घसरण झाली आहे. तज्ज्ञांनुसार, जर इतकी रक्कम आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानला मिळाली असती, तर तेथील लोक 8 महिने बसून खाऊ शकले असते.
हिंडेनबर्ग रिसर्चने दिलेला अहवाल हा भारत आणि भारतीय संस्थांवर केलेला पूर्वनियोजित हल्ला असून अहवालातील माहिती धांदात खोटी आहे, असा आरोप अदानी समूहाने केला आहे. अदानी समूहाने ४१३ पानांचं स्पष्टीकरण दिलं आहे.