Covid Restrictions: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, 'या' राज्यात मास्क अनिवार्य

देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत

Updated: Apr 18, 2022, 03:14 PM IST
Covid Restrictions: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, 'या' राज्यात मास्क अनिवार्य title=

UP Covid Restrictions: देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे (Corona) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिल्ली आणि एनसीआरमध्ये कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधल्या योगी सरकारने (UP Yogi Government) मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता योगी सरकारने गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणं अनिवार्य केलं आहे.

मुख्यमंत्री योगींनी दिले आदेश
NCR जिल्ह्यांतील गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि लखनौ जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये लोकांनी लसीकरण केलं नाही त्यांना शोधून लसीकरण करण्यात यावं असे निर्देशही योगींनी दिले आहेत. लक्षण असलेल्या लोकांची तातडीने चाचणी करण्यात यावी असंही योगी यांनी म्हटलं आहे. 

कोरोना रुग्णांमध्ये वाढ
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सीएम योगींनी एनसीआरमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या 24 तासांत यूपीमध्ये 115 नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 695 झाली आहे. 

जानेवारी महिन्यानंतर राज्यात पहिल्यांदाच कोरोनाचे इतके रुग्ण आढळून येत आहेत. सर्वाधिक प्रकरणे फक्त दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि गाझियाबादमध्ये दिसत आहेत.