"मी जेवढं गोडसेबद्दल वाचलं आहे त्यानुसार तो एक देशभक्त"; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

Ex CM On Nathuram Godse: राहुल गांधींवरही साधला निशाणा. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या भेटीवरही भाष्य करताना जोरदार टोलेबाजी राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 8, 2023, 12:41 PM IST
"मी जेवढं गोडसेबद्दल वाचलं आहे त्यानुसार तो एक देशभक्त"; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान title=
गोडसेंबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्र्यांचं विधान (Photo Department, Government of India)

Ex CM On Nathuram Godse: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचा (Nathuram Godse) उल्लेख करत एक वादग्रस्त विधान केलं आहे. नथूराम गोडसे हा देशभक्त असल्याचं त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटलं आहे. इतकेचं नाही तर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची खिल्ली उडवताना, त्यांचं अडनाव केवळ गांधी आहे असा टोला लगावला. तसेच रावत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनाही लक्ष्य केलं आहे.

गोडसेबद्दल काय म्हणाले रावत?

बलियामध्ये भाजपाच्या जिल्हा कार्यालयामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रावत यांनी महात्मा गांधी, राहुल गांधी, केजरीवाल यांच्याबद्दलची ही विधानं केली. "गांधींची हत्या केली हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. मी जेवढं गोडसेबद्दल वाचलं आहे त्यानुसार तो एक देशभक्त आहे. गांधीजींच्या हत्या करण्याच्या त्यांच्या मताशी मात्र आम्ही सहमत नाही," असं त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले.

"जानवं बाहेर लटकवल्याने राहुल गांधींना..."

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी यांनी अमेरिकेमधील कार्यक्रमांमध्ये केलेल्या विधानांवरुन रावत यांनी त्यांना लक्ष्य केलं. राहुल गांधींवर टीका करताना त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केवळ गांधी अडनाव असल्याने त्यांची विचारसणी गांधीवादी असू शकत नाही असा खोचक टोला लगावला. जानवं बाहेर लटकवल्याने त्यांना त्यांची ओळख बदलता येणार नाही. ते केवळ मोठमोठ्या गोष्टी बोलतात, असंही रावत म्हणाले. राहुल गांधी केवळ आपलं अडनाव मिरवत असतात असंही माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. राहुल गांधी परदेशात जे काही बोलत आहेत त्याचा त्यांच्या पक्षाला काही फायदा होईल असं वाटतं नाही. लवकरच काँग्रेस इतिहासजमा होईल, असंही रावत म्हणाले.

केजरीवाल यांच्यावरही निशाणा

"आपला पक्ष दिवसोंदिवस खचत चालल्याने राहुल गांधी हताश होऊन अशी विधान करत आहेत. ते प्रचंड तणावात आहे. जनता अशाप्रकारे मानसिक तणावात असलेल्या व्यक्तीला स्वीकारणार नाही," असं रावत म्हणाले. काँग्रेसबरोबरच समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बैठकीवरुनही रावत यांनी टोलेबाजी केली.

"दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याइतका नाटकी नेता देशात कोणीही नाही. अखिलेश यांना केजरीवाल यांच्याकडून नाटकं करण्याची कला शिकायची असेल (म्हणून ही भेट झाली)" असं रावत म्हणाले. समाजवादी पार्टीला लक्ष्य करताना हा पक्ष कसा काम करतो लोकांना ठाऊक आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये 'गुंडा राज'ला पाठिंबा दिला. गुंडांना नेते बनवणाऱ्या या पक्षाला लोक लवकरच पुन्हा नाकारतील असंही रावत म्हणाले.