नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे (Coroanvirus) परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी पुन्हा आणण्यासाठी मोदी सरकारने वंदे भारत मोहीम सुरु केली आहे. १६ मे ते २२ मे या काळात या मोहिमेचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात ३१ देशांत १४५ विमाने पाठवून भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जाईल.वंदे भारत मोहिमेच्या सध्या सुरु असलेल्या पहिल्या टप्प्यात एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची विमाने ७ मे ते १४ मे या कालावधीत साधारण ६४ उड्डाणे करतील. या माध्यमातून १२ देशांतील जवळपास १५ हजार नागरिकांना भारतात आणले जाईल, असा अंदाज आहे.
आज पंतप्रधान मोदी करू शकतात या घोषणा
मात्र, यानंतरही अनेक देशांमध्ये भारतीय नागरिक अडकून पडल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात या नागरिकांसाठी संबंधित देशांमध्ये विमाने पाठवली जातील. फ्रान्स, जर्मनी, इटली, आयर्लंड, थायलंड, रशिया, कझाकिस्तान, युक्रेन, किर्गीस्तान, जॉर्जिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नेपाळ या देशांमध्ये भारतीय विमाने पहिल्यांदाच जाणार आहेत. अमेरिकेत सर्वाधिक १३, त्यापाठोपाठ संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) ११, कॅनडात १० , सौदी अरेबियात आणि ब्रिटनमध्ये प्रत्येकी ९ विमाने पाठवण्यात येणार आहेत.
'आरोग्य सेतू' पूर्णपणे सुरक्षित; फ्रान्स हॅकरला सरकारचं उत्तर
यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, या विमानाने येणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू एप्लिकेशन डाऊनलोड करणे बंधनकारक असेल. विमानात चढण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे स्क्रिनींग केले जाईल. यानंतर कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच विमानात प्रवेश मिळेल. याशिवाय, भारतात आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन राहू, असे हमीपत्रही या प्रवाशांना द्यावे लागणार आहे.