Vasu Baras 2020 : दिवाळीला 'वसुबारस' सणापासून सुरूवात

कोरोनाच्या काळातही दिवाळीचा उत्साह 

Updated: Nov 12, 2020, 09:11 AM IST
Vasu Baras 2020 : दिवाळीला 'वसुबारस' सणापासून सुरूवात  title=

मुंबई : कोरोनाच्या काळात मनाला उभारी देणाऱ्या सणाला दिवाळी येत्या गुरूवारपासून सुरू होत आहे. पाच दिवसांची असलेली दिवाळी आजपासून सुरू होत आहे. पहिला दिवस 'वसुबारस'. या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. गावागावांत गायींच्या पूजेचं आयोजन केलं जातं. 

या दिवशी अनेक जण गायीच्या दूधापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करत नाहीत. तर सायंकाळी सवत्स गायीची पूजा केली जाते. यंदा गुरूवारी गोवत्स पूजनाने दीपावलीची सुरूवात होणार आहे. आपल्या देशातील 'ऋषी आणि कृषी' या संस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या वसुबारसेला गाईची सवत्स पूजा करण्यात येते. वसुबारस याचा अर्थ 'वसु' म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी.

या दिवसाला 'गोवत्स द्वादशी' असे देखील म्हणतात. वर्षातील हा एक दिवस गाय आणि वासराच्या पूजेसाठी राखून ठेवला आहे. गुरूवारी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळात गाय आणि वासराचे पूजन करून, त्यांची प्रार्थना करावी. यासह देवाला नैवेद्य आणि गोग्रास द्यावा. यासह गायीला गोडाधोडाचा नैवैद्य अर्पण करावा. 

याच दिवसापासून दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. यंदा दिवाळीच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे हा सण साजरा करता येणार नाही. पण आजच्या ऑनलाईनच्या जमान्यात आपण वसुबारसच्या शुभेच्छा मात्र नक्कीच देऊ शकता. कृषी संस्कृतीशी नाते सांगणारी वसुबारस पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन वेगवेगळ्या सणांच्या रूपाने केले जाते. ह्यात पशू, पक्षी, वृक्ष यांना मोठे महत्व आहे. वसुबारस हा त्याचाच भाग आहे.