सुप्रीम कोर्टात विजय मल्ल्याच्या फाईलमधून महत्त्वाची कागदपत्रे गायब; सुनावणी २० ऑगस्टपर्यंत तहकूब

हरवलेल्या कागदपत्रांमुळे गुरुवारी या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही...

Updated: Aug 6, 2020, 03:12 PM IST
सुप्रीम कोर्टात विजय मल्ल्याच्या फाईलमधून महत्त्वाची कागदपत्रे गायब; सुनावणी २० ऑगस्टपर्यंत तहकूब  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court), फरार असलेल्या विजय मल्ल्याच्या (Vijay Mallya) फाईलमधून महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अवमान प्रकरणात विजय मल्ल्याच्या पुनर्विचार याचिकेची सुनावणी 20 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

विजय मल्ल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरूद्ध जाऊन आपली संपत्ती आपल्या कुटूंबाकडे वर्ग केली. ज्यानंतर मल्ल्याला 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल, अवमान केल्याबद्दल दोषी ठरवलं होतं. त्यानंतर मल्ल्याने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली, ही सुनावणी जवळपास तीन वर्षांनंतर आज लिस्ट करण्यात आली होती. परंतु हरवलेल्या कागदपत्रांमुळे गुरुवारी या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही आणि कोर्टाने या याचिकेवर 14 दिवस सुनावणी तहकूब केली आहे.

बंद किंगफिशर एअरलाइन्सचा (Kingfisher Airlines)मालक असलेल्या विजय मल्ल्याकडे देशातील 17 बँकांचं 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. परंतु मल्ल्या मार्च 2016 मध्ये भारत सोडून ब्रिटनमध्ये पळून गेला होता. भारतीय एजन्सींने यूके कोर्टात मल्ल्याच्या प्रत्यापर्णासाठी अपील केलं होतं. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर यूके कोर्टाने 14 मे रोजी मल्याच्या भारत प्रत्यार्पणाच्या अपीलवर शिक्कामोर्तब केलं.