Video Girl Eating Soap: सोशल मीडियावर कसं, काय, कधी आणि कशामुळे व्हायरल होईल असं सांगणं फार कठीण आहे. त्यातही सोशल मीडियाचा वापर करुन आपलं कौशल्य विकण्याची कला अनेकांनी आत्मसात केली आहे. एकीकडे आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीकोनातून सोशलम मीडियाचा वापर होतो तर दुसरीकडे केवळ व्हायरल कंटेटंसाठी याचा वापर केला जातो. मात्र या दोघांचा मेळ साधुनही काहीजण अगदीच भन्नाट गोष्टी सोशल मीडियावरुन शेअर करत असतात. सोशल मीडियावर असाच एक गोंधळवून टाकणारा व्हिडीओ सध्या व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एक सुंदर तरुणी चक्क हात धुण्याचा साबण खाताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही तरुणी साबण खाल्ल्यानंतर, मला साबण खाणं फार पसंत आहे असंही सांगताना दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कशासंदर्भातील आहे? तो का तयार करण्यात आला आहे? याची कल्पना अनेकांना नाही. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात.
इन्स्टाग्रामवर 21 बी कोलकाता नावाच्या हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज आहेत. या व्हायरल व्हिडीओवर शेकडोच्या संख्येनं प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडीओ सुरुवातीला पाहिल्यानंतर खरोखरच काही क्षण ही तरुणी साबण खातेय की काय अशा प्रश्न पडतो. ही मुलगी अगदी आनंदात साबण खाताना दिसत आहे. सुरुवातीला ही साबण खाणारी तरुणी एका हातात साबण आणि दुसऱ्या हातात हॅण्डवॉशची बॉटल दाखवते. त्यानंतर ही तरुणी अचानक हातात असलेला हात धुण्याचा साबण खाऊ लागते.
नंतर ही तरुणी सूरी घेऊन हा साबण अगदी बॉक्ससहीत कापते. त्या क्षणाला असं लक्षात येतं की व्हिडीओच्या सुरुवातीपासून ही तरुणी जी गोष्ट साबण म्हणून खात आहे तो साबण नसून चक्क केक आहे. हा केक साबणाच्या आकाराचा आणि तसाच दिसणारा बनवण्यात आला आहे. या व्हिडीओला 'मला साबण खायला आवडतो,' अशी कॅप्शन दिली आहे.
या व्हिडीओखाली वापरण्यात आलेले हॅशटॅग पाहिल्यास नेमकं हे प्रकरण काय आहे याचा अंदाज तुम्हाला सहज बांधता येईल. अशाप्रकारे अगदी खरी वाटावी अशी गोष्ट साकारणाऱ्या चित्रकलेच्या शैलीला हायपररिअॅलिस्टीक आर्ट असं म्हणतात.