स्वातंत्र्यानंतर 'या' गावात पहिल्यांदाच धावली बस; जाणून घ्या फडणवीस कनेक्शन...

जर महाराष्ट्रातील एखाद्या भागात स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतर बस सेवा सुरू होत असेल तर... या घटनेवर विश्वासच बसणार नाही. पण ही सत्यकथा आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील 15 गावांची, ज्यांना आज म्हणजे स्वातंत्र्याच्या अवघ्या 77 वर्षांनंतर बस सेवा मिळाली. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Updated: Jan 1, 2025, 07:46 PM IST
 title=
(photo-credited to social media)

Gadchiroli, First ST Bus: आज भारत वेगाने विकसित राष्ट्र होत आहे, तर एकीकडे स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतर गडचिरोलीतील या 15 गावांमध्ये आज 'लालपरी' धावली. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात काही महिन्यांपूर्वीपर्यंत फक्त गर्देवाडा पर्यंतच बस जायची. येथे बस सेवा सुरु करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. आता या सगळ्या अडचणींना मात देत तेथील मागसलेल्या गावांमध्ये 'एस.टी.' धावली आहे. या भागात पुढे छत्तीसगड सीमेच्या दिशेने अनेक किलोमीटर पर्यंत महाराष्ट्राच्या भागात पक्के रस्ते आणि पुलच नव्हते. आता या भागांमध्ये विकासकामांना मार्गी लावण्यात येत आहे. गडचिरोलीतील या क्षेत्रांमध्ये 32 किमी रस्ता देखील बांधला गेला आहे.

या भागातील सर्वात मोठी समस्या म्हणजे या गावांच्या पुढे छत्तीसगड सीमेच्या दिशेने नक्षलवाद्यांची हुकूमत चालत होती. दोन वर्षांपासून या भागामध्ये पोलिस दल नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आपलं वर्चस्व वाढण्यास सुरूवात केली. एका नंतर एक पोलीस मदत केंद्रांची उभारणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने हिम्मतीने गट्टा ते वांगेतुरी या नक्षलप्रभावीत भागांमध्ये वेगवेगळ्या बांधकामांना सुरुवात केली. आणि आज स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गर्देवाडाच्या पुढे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेपर्यंत म्हणजेच वांगेतुरीपर्यंत बस सेवा सुरू झाली आहे.

आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोलीत अनेक विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी या भागातील बस सेवेला हिरवा झेंडा दाखवला. माननीय मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या बस सेवेचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बस मधून गावकऱ्यांसोबत काही अंतरापर्यंत प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी शेजारी बसलेल्या नागरिकांसोबत संवाद देखील साधला. नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यातील मुख्यमंत्र्यांचा पहिल्यांदा धावणाऱ्या या एसटीने प्रवास एक महत्त्वाची बाब आहे. हा प्रवास आता पूर्णपणे भीतीमुक्त असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 'छत्तीसगडजवळील उत्तर गडचिरोली आता मोओवाद्यांच्या दहशतीपासून मुक्त आहे. लवकरच गडचिरोलीचा दक्षिण भागही मोओवाद्यांच्या दहशतीपासून मुक्त करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. "अशा उपक्रमांद्वारे आपण गडचिरोलीसारखं क्षेत्र विकसित बनवरणार आहोत," असं देखील मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना सांगितलं.
 

कित्येक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर एटापल्ली तालुक्यातील गावांना बस सेवा मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. तसेच नागरिकांनी 'ही बस सेवा आम्हाला आरोग्य, शिक्षण आणि इतर शासकीय व प्रशासकीय कामासाठी अत्यंत उपयोगाची ठरेल', अशी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे.