तीन मुलांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, चालकाने अचानक टर्न घेतला अन्...; धक्कादायक घटना CCTV त कैद

Viral Video: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत एका कारचालकाने तीन मुलांना कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 13 जुलै रोजी ही घटना घडली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 19, 2023, 09:42 AM IST
तीन मुलांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, चालकाने अचानक टर्न घेतला अन्...; धक्कादायक घटना CCTV त कैद title=

Viral Video: उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊत (Lucknow) एका कारचालकाने तीन मुलांना कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांच्या वडिलांशी असणाऱ्या भांडणाच्या रागातून त्याने कृत्य केलं. 13 जुलै रोजी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. मुलं गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच आरोपी कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

लखनऊच्या मलिहाबाद परिसरात 13 जुलै रोजी ही घटना घडली. मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र उर्फ सिताराम हा सिंधवा गावातील काझीखेडा परिसरात राहतो. सितारामची तीन मुलं शिवानी (8), स्नेहा (4) आणि कृष्णा (3) ही मार्केटमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मुलं रस्त्यावरुन जात असतानाच आरोपी गोविंदा याने त्यांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. कारने धडक दिल्याने मुलं गंभीर जखमी असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या घटनेचा 42 सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत मुलं रस्त्याच्या कडेने चालताना दिसत आहेत. यावेळी आरोपी दुसऱ्या बाजूने गाडी घेऊन जात असतो. पण मुलं दिसताच तो अचानक गाडी वळवतो आणि तिन्ही मुलांच्या अंगावर घालतो. धडक बसल्यानंतर मुलं खाली कोसळताना दिसत आहेत. 

मुलांना धडक दिल्यानंतर आरोपी गोविंदाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याची गाडी अडवली आणि पकडलं. काही वेळाने सितारामही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. 

पोलिसांनी आरोपी चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. लखनऊ पोलिसांनी ट्वीट करतही माहिती दिली आहे. "मलिहाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केल्यानंतर आता कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.