Viral Video : देशात जवळपास सर्वच शहरात मॉल संस्कृती वाढत चालली आहे. कपड्यांपासून खाण्यापर्यंत सर्वच गोष्टी आता मॉलमध्ये (Mall) मिळू लागल्या आहेत. तरुण-तरुणींचं तर फिरण्यासाठी मॉल हे हक्काचं ठिकाण बनलं आहे. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल आहे. यात एका वृद्ध शेतकऱ्याला (Farmer) मॉलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. कारण काय तर या शेतकऱ्याने धोतर (Farmer Wearing Dhoti) नेसलं होतं. सुरक्षा रक्षकांनी या वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाऊ दिलं नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
काय आहे नेमकी घटना?
ही घटना बंगळुरुमधली हे. बंगळुरुच्या एका मॉलमध्ये एक वृद्ध शेतकरी आपल्या मुलासह चित्रपट पाहाण्यासाठी आला होता. पण मॉलच्या सुरक्ष रक्षकांनी त्यांना आत जाण्यापासून मज्जाव केला. मॉलमध्ये जाण्यासाठी कोणताही ड्रेस कोड लागू केलेला नाही. मग कोणत्या उद्देशाने सुरक्षा रक्षकांना धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश दिला नाही असा प्रश्न युजर्स विचारतायत.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत धोतर नेसलेला एक वृद्ध मॉलच्या समोर उभा असलेला दिसतोय. आपल्या मुलासह चित्रपट पाहण्यासाठी तो बंगळुरुच्या जीटी मॉलमध्ये आला होता. पण आत जात असताना मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवलं. शेतकऱ्याच्या मुलाने अडवल्याचं कारण विचारलं. यावर सुरक्षा रक्षकांनी मॉलमध्ये धोतर नेसून प्रवेश दिला जाणार नाही असं सांगितलं. इतंकंच नाही तर त्या वृद्धाला पँट नेसून आलात तरच मॉलमध्ये प्रवेश मिळेल असंही सांगण्या आलं.
वृद्ध शेतकरी आणि त्याच्या मुलाने सुरक्षा रक्षकांकडे बरीच विनवणी केली. आपण असेच कपडे परिधान करतो, असंही त्या शेतकऱ्यांनी सांगितलं. पण यानंतरही सुरक्षा रक्षकांनी त्यांना मॉलमध्ये जाण्यापासून अडवलं. आपण चित्रपट पाहायला आलो आहे, चित्रपट सुरु होईल, आम्हाला जाऊ द्या असंही वृद्ध शेतकरी आणि त्यांच्या मुलाने सांगितलं. पण कपडे बदलल्याशिवाय प्रवेश देणार नसल्यावर सुरक्षा रक्षक ठाम होते.
Under Karnataka Congress govt patronage
Farmers are being abused and insulted for wearing Dhoti? Banned entry in a mall!
Karnataka CM wears a dhoti!
Dhoti is our pride.. should farmer wear a tuxedo in a mall?How is Karnataka Congress allowing this? They are most anti… pic.twitter.com/NvctuwPBpp
— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) July 17, 2024
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सने संताप व्यक्त केला आहे. याचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. भाजप प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप भाजपने केले आहेत. कर्नाटकमधल्या शेतकऱ्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.