राष्ट्रपतीपदासाठीचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा २० जुलैची

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेसह सर्व राज्यांच्या विधान भवनांमध्ये मतदान पार पडलं.

Updated: Jul 17, 2017, 08:05 PM IST
राष्ट्रपतीपदासाठीचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा २० जुलैची title=

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेसह सर्व राज्यांच्या विधान भवनांमध्ये मतदान पार पडलं. दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत खोली क्रमांक 62 मध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली.

या निवडणुकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतल्या आहेत. एनडीएच्या बाजूनं एकूण मतदानापैकी ७०% मतदान आहे. त्यामुळे कोविंद यांचा विजय निश्चित मानला जातोय. तरीही यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांनी संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय. सकाळपासूनच मतदानासाठी खासदारांनी रांगा लावल्या होत्या. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल २० जुलैला लागणार आहे.

महाराष्ट्रातल्या विधान भवनात विधानसभेच्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विधानसभेच्या २८८ पैकी २८७ आमदारांना मतदानाचा हक्क बजावला. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर हे परदेशात असल्यानं मतदान करू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांनीही सुरूवातीलाच मतदान केलं.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून तुरूंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही विधान भवनात जाऊन राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला...तसंच सध्या तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचेच दुसरे आमदार रमेश कदम यांनीही विधान भवनात जाऊन मतदान केलं.

ममतांच्या तृणमूलमध्ये उभी फूट

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून ममता बँनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडलीय. तृणमूल काँग्रेसच्या त्रिपुरातल्या सहा आमदारांनी एनडीँएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केलंय. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनीही एनडीला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती शिवपाल यादवांनी दिलीय. त्यामुळं एनडीएला अनपेक्षित लाभ झालाय. आधीच एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड आहे.