Ram Setu Adam's Bridge Map : रामायण म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येतो तो रामसेतू. खरंच रामसेतू रामाच्या काळात बांधला होता का? या प्रश्नावरुन नेमहीच वाद विवाद होतात. रामसेतू हा रामानेच बांधला असा दावा अनेकजण करतात. तर, हा सेतू समुद्रात नैसर्गिकरित्या तयार झाला असा अनेकांचा दावा आहे. या वाद विवादात ISRO च्या संशोधकांनी रामसेतूचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे, रामसेतूचा समुद्राखालचा नकाशा तयार करण्यात आला आहे. यामुळे रामसेतू कधी बांधला गेला याचे रहस्य उलगणार आहे.
रामसेतू तामिळनाडूच्या पंबन बेट आणि श्रीलंकेतील मन्नार बेट यांच्यामधील सामुद्रिक रचना आहे. दक्षिणेत या सेतूला 'रामसेतू' याचं नावाने ओळखलं जातं, तर श्रीलंकेत याला 'अडंगा पालम' किंवा 'अॅडम्स ब्रिज' असे म्हंटले जातो. भारतीय शास्त्रज्ञांनी राम सेतूचा (Adam’s Bridge) तपशीलवार नकाशा तयार केला आहे. समुद्राखालचा आजपर्यंतचा सर्वात मोठा नकाशा आहे.
अमेरिकन सॅटेलाइट डेटाच्या मदतीने समुद्राखालील रामसेतूचा नकाशा तयार करण्यात आला आहे. हा नकाशा रेल्वेच्या बोगी/कंपार्टमेंटइतका मोठा आहे. या नकाशानुसार 29 किलोमीटर लांबीच्या राम सेतूची समुद्रसपाटीपासून उंची 8 मीटर इतकी आहे. हा नकाशा भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या शास्त्रज्ञांनी बनवला आहे. रामसेतूबाबत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन 'सायंटिफिक रिपोर्ट्स' जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
राम सेतू म्हणजेच ॲडम्स ब्रिज हा भारतातील रामेश्वरम बेटाच्या दक्षिण-पूर्वेकडील धनुषकोडीपासून, श्रीलंकेतील मन्नार बेटाच्या उत्तर-पश्चिम टोकापर्यंत, तलाईमन्नारपर्यंत पसरलेला आहे. चुनखडीच्या साखळीने बनलेली समुद्रावर तयार करण्यात आलेली पुलासारखी रचना आहे. रामसेतूचा काही भाग पाण्याच्या वर दिसतो. राम सेतूवर खडक किंवा झाडे नाहीत. राम सेतू हा लंकेत जाण्यासाठी रामाच्या वानरसेनेने बांधलेला पूल आहे असा दावा रामायणात करण्यात आला आहे.
नासाच्या ICESat-2 या सॅटेलाईटच्या मदतीने इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञांनी रामसेतूचा नकाशा तयार केला आहे. हा नकाशा 29 किमी लांबीच्या राम सेतूचा पहिला पाण्याखालील नकाशा आहे. राम सेतूचा 99.98 टक्के भाग उथळ आणि अतिशय उथळ पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे जहाजांद्वारे त्याचे सर्वेक्षण करणे शक्यच नाही. यामुळे शास्त्रज्ञांनी पुलाखाली 11 अरुंद नाल्यांचे निरीक्षण केले. या नाल्यांची खोली 2-3 मीटर इतकी होती. यामुळे मन्नारचे आखात आणि पाल्क सामुद्रधुनी दरम्यान पाण्याचा प्रवाह सुलभ झाला. भूवैज्ञानिक पुराव्यांच्या मदतीने देखील रामसेतूचे रहस्य उलगडण्याक आले आहे. भारत आणि श्रीलंकेच्या उत्पत्तीचा एकमेकांशी संबध आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन्ही प्राचीन गोंडवाना खंडाचा भाग होते. जवळपास 35-55 दशलक्ष वर्षांपूर्वी, गोंडवाना, टेथिस समुद्रात उत्तरेकडे सरकत, लॉरेशिया नावाच्या खंडावर आदळला. अशा प्रकारच्या टेक्टोनिक क्रियाकलापांमुळे आणि हिमनद्या वितळल्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील चढउतारांमुळे पूल तयार होऊ शकतात असा देखील शास्त्रज्ञांचा दावा आहे.