तिरूवअनंतपुरम: आपण मदत करतो म्हणजे पीडित समुदायावर जणू उपकारच करतो, अशा अविर्भावात वर्तन करणाऱ्या एका मंत्री महोदयांचा व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कर्नाटकमधील मंत्री एच डी रेवन्ना यांचा आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करताना त्यांनी पीडितांना बिस्किटे वाटली. पण, धक्कादायक असे की, ते बिस्किटे वाटत नसून अक्षरश: पीडितांच्या अंगावर फेकताना व्हिडिओत दिसते आहेत. हा प्रकार पुढे येताच रेवन्ना यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.
महापुरामुळे केरळमध्ये मोठा हाहाकार उडाला. जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली. केरळ सरकारनेही मदतीसाठी जोरदार प्रयत्न केले. मदतीत कोणतीही कसर राहू नये यासाठी सरकारकडून अद्यापही प्रयत्न सुरू आहेत. पण, संपूर्ण यंत्रणाच कोलमडल्यामुळे पूरग्रस्त पीडितांना मदत करण्यासाठी राज्याबाहेरूनही मदत पोहोचविणयात येत आहे. महाराष्ट्रानेही केरळला मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. तशीच मदत कर्नाटक राज्यानेही केली आहे. पण, दरम्यान, कर्नाटच्या मंत्र्यांनी मदत वाटपात घोळ घातल्याने ते चर्चेचा विषय बनले आहेत. रेवन्ना हे विकास मंत्री असून मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचे बंधू आहेत.
रेवन्नाच्या या वर्तनाचा हा व्हडिओ सोशल मीडियाच नव्हे तर, मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्यांवरूनही झळकला आहे. त्यानंतर राजकारण्यांकडून हा मुद्दा चर्चेचा बनवाला आहे. हा अत्यंत असंवेदनशील प्रकार आहे. तसेच, मंत्री महोदय पूरग्रस्तांना फेकत बिस्किट वाटणे समाजकार्य नाही. हा अंहकार आणि असभ्य व्यवहार असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते एस सुरेश कुमार यांनी दिली आहे.
H D Revanna, brother of @hd_kumaraswamy is throwing biscuits to the people affected by floods in Karnataka, as if he is feeding to the fishes.
This is an inhuman approach towards helping people who are stuck in a difficult situation. pic.twitter.com/sY25imlFtl
— Know The Nation (@knowthenation) August 20, 2018
दरम्यान, घटनास्थळावरचा गोंधळ आणि नजरचूकीने हा प्रकार घडल्याचे सांगत कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आपल्या भावाचा बचाव केला आहे. ‘आपल्याला या प्रकाराची माहिती नव्हती. मात्र, वृत्तवाहिन्यांमध्ये आल्यानंतर या प्रकाराबद्दल आपल्याला माहिती मिळाली. मी माहिती घेतली आहे. बिस्किटं वाटत असताना तेथे खूप गर्दी होती, हलण्यासही जागा नव्हती’, असं मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.