सलमानला आत टाकणारा, बिष्णोई समाज आहे तरी कोण?

 १९९८ साली जेव्हा सलमान खानवर काळवीट शिकारीचे आरोप लागले. तेव्हा या समाजाची निसर्गाबद्दलची आस्था जगासमोर आली.

Updated: Apr 5, 2018, 03:58 PM IST
सलमानला आत टाकणारा, बिष्णोई समाज आहे तरी कोण? title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : सलमान खानवर अनेक आरोप लागले, तरीही सलमानचे फॅन कायम आहेत, पण कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा स्वत:च्या पंथाने ठरवलेल्या तत्वावर कट्टरतेने प्रेम करणारा बिष्णोई पंथ आहे तरी काय? हा प्रश्न सर्वांना पडला आहे, आणि हे जाणून घेणे फार महत्वाचं आहे, कारण वृक्ष आणि प्राण्यांच्या संरक्षणाबाबत हा समाज आपली तत्व पाळत आला आहे.

सलमानला जेलची हवा 

काळवीट शिकार प्रकरणी सलमानला जेलची हवा खावी लागली आहे. त्यानंतर बिष्णोई समाज प्रसिद्धीस आला. बिष्णोई एक विश्वास आहे, एक पंथ आहे, एक समाज असल्याचं बिष्णोई समाजाचे लोक सांगतात. बिष्णोई समाजाला १९९८ आधी फार कमी लोक ओळखत होते, पण १९९८ साली जेव्हा सलमान खानवर काळवीट शिकारीचे आरोप लागले. तेव्हा या समाजाची निसर्गाबद्दलची आस्था जगासमोर आली.

निसर्गाबद्दल प्रचंड आस्था ठेवणारा पंथ

निसर्गाबद्दल प्रचंड आस्था ठेवणारे हे लोक राजस्थानात राहतात. राजस्थानात पाण्याच्या एक एक थेंबासाठी लोक तरसतात, पण बिष्णोई समाज जेथे जेथे राहतो, तेथे तुम्हाला पाण्याचे पाणवठे दिसतील, पशू, पक्षी, प्राणी दिसतील. बिष्णोई पाणी अडवतात, जिरवतात वाचवतात.

निसर्गाला संपन्न ठेवण्याचं काम

बिष्णोई निसर्गाचं संवर्धन करतात, आणि यामुळेच आपण संपन्न आहोत, हे बिष्णोई समाजाचं तत्व आहे. बिष्णोई समाज राजस्थानात पश्चिम भागात, पाकिस्तान बॉर्डरला मोठ्या प्रमाणात आहेत, येथे तुम्हाला प्राणी मोठ्या प्रमाणात दिसतात. वनविभागात दिसणार नाहीत, एवढी निसर्ग संपन्नता तुम्हाला हा समाज राहतो तिथे दिसतो.

कधी आणि कुणी केली बिष्णोई पंथाची स्थापना?

सदगुरु जम्भेश्वरजी पंवार यांनी १५४२ मध्ये बिष्णोई समाज - पंथाची स्थापना केली. पर्यावरण संरक्षण आणि प्राण्यांवर दया करण्यावर या समाजाचा विशेष भर आहे, विष्णूला मानणारा समाज आणि २० आणि ९ तत्व मिळून बीस नोई अशावरून बिष्णोई असं या पंथाला नाव पडलं. बिष्णोई समाजात बिष्णोई जाट यांचाही समावेश आहे.

बिष्णोई समाजाचे २९ तत्व

१. तीस दिवस सूतक पाळणे

२. पाच दिवसाची मासिक पाळी

३. सकाळी लवकर अंघोळ करणे

४. शील, संतोष आणि निष्कपट राहणे

५. सकाळ संध्याकाळ प्रार्थना

६. संध्याकाळच्या आरतीत विष्णूचा जप करणे

७. पहाटे हवन करणे

८. पाणी गाळून प्या, शुद्ध वाणी असावी

९. ईंधन निवडणे आणि दूध गाळून पिणे

१०. क्षमा सहनशीलता ठेवा

११. दया-नम्र भाव ठेवा

१२. चोरी करू नये

१३. निंदा करू नये

१४. खोटं बोलू नये

१५. वाद विवाद करू नये

१६. अमावस्येला व्रत ठेवा

१७. भजन विष्णूचं करा

१८. प्राणी मात्रांवर दया करा

१९. हिरवे झाडं कापू नका

२०. सहन करता येण्यासारखं नसेल तरी सहन करा

२१. आपल्या हाताने जेवण बनवा

२२. शेळी कसायाला विकू नये

२३. बैलाला बंधक बनवू नका

२४. अफूचं व्यसन करू नका

२५. तम्बाखू खाऊ पिऊ नये

२६. भांग पिऊ नये.

२७. मद्यपान करू नये.

२८. मांस खाऊ नये.

२९ निळे कपडे घालू नयेत.