पाकनं दहशतवाद रोखला तर आम्हीही नीरज चोपडा बनू - सेनाप्रमुख

'सुरूवात त्यांच्याकडून व्हायला हवी, त्यांना दहशतवादाला लगाम घालावी लागेल'

Updated: Sep 6, 2018, 11:38 AM IST
पाकनं दहशतवाद रोखला तर आम्हीही नीरज चोपडा बनू - सेनाप्रमुख  title=

नवी दिल्ली : सेना प्रमुख बिपिन रावत यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवाद संपवण्यासाठी इशारा दिलाय. पाकिस्ताननं दहशतवादाला आळा घातला तर आम्हीही नीरज चोपडा बनू, असं बिपिन रावत यांनी म्हटलंय. नुकत्याच, इंडोनेशियामध्ये पार पडलेल्या आशियाई खेळांत भारताच्या नीरज चोपडानं पाकिस्तान आणि चीनच्या खेळाडूंना मागे टाकत जेवलीन थ्रो (भाला फेक)मध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. चीनच्या किझेन लियूला रौप्य पदक तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम याला कांस्य पदक मिळालं होतं. पोडियमवर नीरजनं अर्शद आणि लियूसोबत हात मिळवला होता. यावेळी, पाकिस्तानी खेळाडू अर्शदसोबत हात मिळवतानाचा नीरजचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना सेनाप्रमुख म्हणाले, 'सुरूवात त्यांच्याकडून व्हायला हवी, त्यांना दहशतवादाला लगाम घालावी लागेल, त्यांनी दहशतवाद रोखला तर आम्हीही (आर्मी) नीरज चोपडा बनू' 

नीरज आणि अर्शदचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना टेनिस खेळाडू सानिया मिर्झानं म्हटलं होतं, खेळाच्या माध्यामातून तुम्ही तुमच्या मुलांना सर्वश्रेष्ठ शिक्षण देऊ शकता.

तर, पदक समारंभावेळी माझं लक्ष केवळ राष्ट्रगीताकडे होतं... आजुबाजुला कोणत्या देशांचे खेळाडू उभे आहेत हे माझ्या ध्यानीमनीही आलं नाही, असं आपल्या व्हायरल झालेल्या आपल्या फोटोबद्दल नीरजनं म्हटलं होतं.