माझा नवरा माझा नवरा! पण त्याच्या संपत्तीवर बायकोचा किती हक्क?

नवऱ्याच्या संपत्तीवर बायकोचा किती अधिकार असतो याबाबतचा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टानं (Supreme Court)  दिला आहे.    

Updated: Feb 5, 2022, 08:02 PM IST
माझा नवरा माझा नवरा! पण त्याच्या संपत्तीवर बायकोचा किती हक्क?  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली :  विवाहित महिलांसाठी काहीशी धक्कादायक बातमी. नवऱ्याच्या संपत्तीवर (Husband Property) बायकोचा पूर्ण अधिकार असत नाही, असा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टानं (Supreme Court)  दिला आहे. सुप्रीम कोर्टानं नेमका काय निकाल दिलाय, चला पाहूयात. (wife cannot be full owner of husband's property for life supreme court decision)

नवऱ्याच्या निधनानंतर त्याची सगळी संपत्ती बायकोची असते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र सुप्रीम कोर्टानं मंगळवारी दिलेल्या निकालामुळं हा समज दूर झाला आहे. 

जर एखादा हिंदू पुरूष, आपल्या स्वकमाईनं मिळवलेल्या संपत्तीचा मालक असेल आणि त्यानं आपल्या मृत्यूपत्रात बायकोला संपत्तीमध्ये मर्यादित वाटा दिला असेल, तर त्या संपत्तीवर बायकोचा हक्क आहे, असं मानता येणार नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला.

नवऱ्याची सर्व संपत्ती बायकोची नाही

तुलसी राम नावाच्या हरियाणातील व्यक्तीनं  15 एप्रिल 1968 मध्ये मृत्यूपत्र केलं होतं. यामध्ये तुलसी राम यांनी बायकोला संपत्तीमध्ये मर्यादित वाटा दिला होता.
तुलसी राम यांचं 17 नोव्हेंबर 1969 रोजी तुलसी रामचं निधन झालं. त्यानंतर त्याच्या बायकोनं संपूर्ण मालमत्तेवर दावा केला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं नवऱ्याच्या स्वअर्जित मालमत्तेवर बायकोचा संपूर्ण अधिकार असत नाही, असा निकाल दिला.

स्वकमाईनं मिळवलेली संपत्ती आणि वडिलोपार्जित संपत्ती असे संपत्तीचे दोन प्रकार असतात. नवऱ्यानं स्वकमाईनं मिळवलेल्या संपत्तीवर बायकोचा किती अधिकार आहे, याचा निर्णय परिस्थितीनुरूप वेगवेगळा असू शकतो. 

स्वकमाईच्या मालमत्तेवर त्या संबंधित व्यक्तीचा पूर्ण अधिकार असतो. संपत्तीबाबत तो कोणताही निर्णय घेऊ शकतो. त्यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता, घर, दुकान, जमीन किंवा सोने-चांदी यापैकी कोणत्याही मालमत्तेचा समावेश असू शकतो.

दरम्यान, वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा देखील अधिकार असतो, असा निकालही अलिकडेच सुप्रीम कोर्टानं दिला होता.