चंदीगड: नवऱ्याच्या पश्चात किंवा त्याच्या हत्येनंतर देखील पत्नीचा फॅमेली पेन्शनवर हक्क राहणार आहे. असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे. पत्नीला फॅमेली पेन्शनपासून वंचित ठेवता येणार नाही असं यावेळी न्यायालयानं म्हटलं आहे. सोन्याचं अंड देणाऱ्याची कुणीही हत्या करत नाही. त्यामुळे पत्नीने जरी पतीची हत्या केली असेल तरीदेखील तिला फॅमेली पेन्शनमध्ये गृहित धरणं बंधनकार असणार आहे.
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयानं याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीने आपल्या नवऱ्याची हत्या केली असेल तरीदेखील ती फॅमेली पेन्शनचा हक्क सांगू शकते. तिचा तो हक्क आहे. तिला त्यामधून वेगळ करता येणार नाही असं यावेळी उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.
बलजीत कौर यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी करत असताना हा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे. बलजीत कौर यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत सरकारी कर्मचारी बलजीत यांच्या पतीचा 2008मध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणी नंतर हत्येचा गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास सुरू होता. बलजीत यांना या प्रकरणी 2011मध्ये दोषी ठरवण्यात आलं.
दोषी ठरवण्याआधी पतीच्या मृत्यूनंतरही त्यांना फॅमेली पेन्शन मिळत होतं मात्र त्यांना दोषी ठरवल्यानंतर हरियाणा कोर्टानं त्यावर स्थगिती आणली. बलजीत यांना मिळणारं फॅमेली पेन्शन बंद झालं. त्यांनी याविरोधात न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं आधीच्या निर्णयाला स्थगिती दिली. पत्नी पतीच्या हत्ये प्रकरणी दोषी असो किंवा नसो तिला फॅमेली पेन्शनवर हक्क सांगता येणार आहे. याशिवाय तिला तो मिळायला हवा असंही न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. याचिकाकर्त्याला त्याची रक्कम दोन महिन्यात देण्याचे आदेश न्यायालयानं देण्याचे निर्देश दिले आहेत.