नवी दिल्ली : दिल्लीत लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. एका जवानाला एक महिला भर रस्त्यात मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडीओत या महिलेच्या गाडीचा नंबर दिसत होता.
नंबरच्या आधारावर गाडी मालकाचा पत्ता मिळाला आणि पोलिसांनी घर गाठलं. या प्रकरणी लष्कराने तक्रार दाखल केली होती. कस्मृती कालरा असे या ४४ वर्षीय महिलेचे नाव आहे, तिने जवानाला का मारले, याबाबत अद्याप समजू शकले नाही.
जेसीओ महावीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर दिल्लीतील निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर लष्कराच्या ट्रकमध्ये बसले होते. स्मृती या वेगाने आपल्या इंडिका कारमधून अचानक आल्या आणि लष्कराच्या वाहनाला ओव्हरटेक करत त्यासमोर आपली कार थांबवली. त्यानंतर महावीर सिंह खाली उतरले. यावेळी स्मृती यांनी थेट जवानावर हात उचलला.
जवान स्मृती यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्यांनी काहीच एकून न घेता जवानाला मारण्यास सुरुवात केली. हे पाहून ट्रकमधील अन्य जवान खाली उतरले. त्यांनी स्मृती यांना मारण्याचा जाब विचारायचा प्रयत्न केला, मात्र त्या आपल्या कारमध्ये बसून निघून गेल्या.