तरुणीनं एअरटेलच्या 'मुस्लिम'ऐवजी 'हिंदू' प्रतिनिधीची मागणी केल्यानंतर...

 ती स्वत:ला प्राऊड भारतीय, प्राऊड हिंदू आणि सेनेवर प्रेम करणारी असल्याचं सांगते

& Updated: Jun 20, 2018, 08:43 AM IST
तरुणीनं एअरटेलच्या 'मुस्लिम'ऐवजी 'हिंदू' प्रतिनिधीची मागणी केल्यानंतर...  title=

मुंबई : पूजा सिंह नावाच्या एका तरुणीचं वादग्रस्त ट्विट सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जातंय. एका मोबाईल कंपनीची तक्रार सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीपर्यंत पोहचवणाऱ्या पूजानं ट्विटरवर कंपनीच्या एका मुस्लिम प्रतिनिधीशी बोलण्यास नकार दिला... इतकंच नाही तर तिनं आपल्याला कंपनीनं हिंदू प्रतिनिधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी केली. त्यानंतर कंपनीच्या एका हिंदू प्रतिनिधिनं पूजाला उत्तर दिलं. मात्र, त्यानंतर जाती-धर्मावरून भेदभाव करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिल्यावरून कंपनीवरही टीका झाली. 

पूजा सिंह हिच्या ट्विटर हॅन्डलवरून मिळालेल्या माहितीनुसार ती लखनऊची रहिवासी आहे... आणि एका मॅनेजमेंट कंपनीत नोकरीला आहे. ती स्वत:ला प्राऊड भारतीय, प्राऊड हिंदू आणि सेनेवर प्रेम करणारी असल्याचं सांगते.  

पूजानं सोमवारी एअरटेल कंपनीला एक ट्विट करत म्हटलं 'एअरटेल तुमची डीटीएच कस्टमर सर्व्हिस खराब आहे. मी डीटीएचशी निगडीत एक तक्रार नोंदवली. परंतु, सर्व्हिस इंजिनिअरनं माझ्याशी चुकीचं वर्तन केलं. त्याचे शब्द होते - तू फोन ठेव, परत कॉल करू नको. अशा पद्धतीनं एअरटेल आपल्या उपभोक्त्यांना लुटतंय'

पूजाच्या या ट्विटवर कंपनीच्या एका प्रतिनिधीनं उत्तर दिलं 'आम्ही लवकरच या तक्रारीसंबंधी चर्चा करू - शोएब'... शोएबनं कंपनीच्या नियमानुसार आपलं नाव ट्विटमध्ये नोंदवलं होतं.

पण यावर मात्र पूजानं मुस्लिम प्रतिनिधीशी बोलण्यास नकार दिला. 'प्रिय शोएब, तुम्ही मुस्लिम आहात आणि मला तुमच्या कामाच्या नैतिकतेवर भरवसा नाही कारण उपभोक्त्यांच्या सेवेसाठी कुराणात वेगळ्या गोष्टी असू शकतात. म्हणून माझी एअरटेलकडे मागणी आहे की मला एक हिंदू प्रतिनिधी उपलब्ध करून द्यावा' 

यानंतर एअरटेलच्या आणखीन एका प्रतिनिधीनं ट्विट केलं... 'पूजा तुमच्याशी जसं बोलणं झालं, त्यानुसार तुम्ही चर्चेसाठी तुमची योग्य वेळ सांगा, आम्हाला तुमची मदत करण्यासाठी तुमचा फोन नंबर शेअर करा, गगनजोत'

यावरूनही वाद निर्माण झाला... सोशल मीडियावर लोकांनी 'पूजानं मुस्लिम प्रतिनिधीशी बोलण्यास नकार दिल्यानं एअरटेलनं हिंदू प्रतिनिधी उपलब्ध केला' असं म्हणत कंपनीवर जोरदार टीका केली. त्यातच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत 'एअरटेल मी माझ्या टाईमलाईनवर संपू्र्ण चर्चा वाचली. मी आता कंपनीला एक रुपयाही देणार नाही. मी माझा नंबर पोर्ट करतोय. सोबतच डीटीएच आणि ब्रॉडबॅन्ड सुविधाही बंद करतोय' आपला निषेध नोंदवला. 

पूजा सिंहच्या ट्विटवर कंपनीकडून एक ट्विट करण्यात आलं... 'पूजा एअरटेलमध्ये आम्ही धर्म किंवा जातीच्या आधारावर उपभोक्ते किंवा कर्मचाऱ्यांशी भेदभाव करत नाही. आम्ही तुम्हालाही हीच विनंती करतोय. शोएब आणि गगनजोत आमच्या कस्टमर केअर टीमचा एक भाग आहेत'

सोशल मीडियावरच्या या वादात अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. काहींनी पूजाची बाजू घेत... तर काहींनी तिला फैलावर घेत... तर काहींनी कंपनीला फैलावर घेत... यावर अली खान नावाच्या युझरनं आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलंय 'हा हिंदू आहे तो मुस्लिम आहे. माणूस कुठे आहे, माहीत नाही'