High Court On Consensual Physical Relationship: कर्नाटक हायकोर्टाने बंगळुरुमधील एका महिलेने दाखल केलेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या प्रकरणाला निकाली काढत याचिकाच रद्द केली आहे. कायद्याचा दुरुपयोग कसा केला जातो याचं हे प्रकरण उत्तम उदाहरण असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. याचिकाकर्त्या महिला 6 वर्ष एका व्यक्तीबरोबर रिलेशनशीपमध्ये होती. मात्र लग्नाचं आश्वासन देऊन जोडीदाराने नकार दिल्याचा आरोप या महिलेनं करत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणावरुन हायकोर्टाने याचिकाकर्त्या महिलेलाच फैलावर घेतलं आहे.
'हे प्रकरण 1,2,3,4 किंवा 5 नाही तर 6 वर्षांच्या रिलेशनशीपसंदर्भातील आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन भेट झाल्यानंतर याचिकाकर्ता आणि जोडीदारामध्ये 6 वर्ष परस्पर संमतीने शारीरिक संबंध/ लैंगिक संबंध ठेवल्याचं प्रकरण आहे. तक्रारीमध्येच सर्व तपशील देण्यात आला आहे. 27 डिसेंबर 2019 पासून दोघांमधील जवळीक कमी झाली. 6 वर्ष परस्पर सहमतीने एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर दोघांमध्ये दुरावा आल्याचा अर्थ बलात्कार झाला असा घेता येणार नाही,' असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.
न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांनी बेंगळुरु शहरामधील इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये आणि दावणगेरेमधील महिला पोलीस स्टेशनमध्ये 2021 मध्ये याचिकाकर्त्या महिलेने एफआयआर दाखल केली. ही एफआयआर रद्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. 'याचिकाकर्ते आणि ज्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची आली त्या दोघांमध्ये पहिल्या दिवसांपासून संमतीने काही गोष्टी घडल्या. त्यानंतर 27 डिसेंबर 2019 पर्यंत हे घडत होतं,' असं हायकोर्टाने म्हटलं आहे. दोघांमध्ये 6 वर्ष लैंगिक संबंध होते याचा उल्लेख करत न्यायमूर्तींनी याला भारतीय दंड संहितेच्या कलम 376 अंतर्गत बलात्कार म्हणता येणार नाही असं निरिक्षण नोंदवलं. न्यायाधीश प्रमोद सूर्यभान पवार विरुद्ध महाराष्ट्र राज्य या सुप्रीम कोर्टातील निकालाचा संदर्भ देत, 'पुढील कारवाई सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली तर या प्रकरणाबरोबरच अन्य काही प्रकरणांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालांचं हे उळ्लंघन ठरेल,' असं म्हटलं.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, "याचिकाकर्त्याने 2013 साली फेसबुकच्या माध्यमातून तक्रारदार महिलेशी मैत्री केली. त्याच्या सांगण्यानुसार दोघे जवळजवळच राहायचे त्यामुळे आपण फार चांगला स्वयंपाक बनवतो असं सांगून या महिलेला तो नेहमी त्याच्या घरी घेऊन जायचा. तो तिच्यासाठी छान जेवण बनवायचा. जेव्हा ती त्याच्या घरी जायची तेव्हा ती बिअरही प्यायची. त्यानंतर दोघेही परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवायचे. जवळजवळ 6 वर्ष लग्नाचं आस्वासन देऊन दोघांमधील शरीरसंबंध ठेवण्याचा प्रकार सुरु होता. यानंतर याचिकाकर्त्याने लग्नास नकार दिला. 8 मार्च 2021 रोजी या महिलेने इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक, गुन्हेगारीसंदर्भात धमकावण्याचा आरोप करत याचिका दाखल केली. त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर ही व्यक्ती दावणगेरेमध्ये राहत असल्याचं समजल्यानंतर ही महिला तिथे आली आणि तिने येथील पोलीस स्टेशनमध्ये मारहाण आणि बलात्काराचा गुन्हा या दाखल केला," असं नमूद केलं आहे.
दुसऱ्या तक्रारीमध्ये अन्य एका महिलेच्या नावाचाही उल्लेख आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करुन घेतलं आहे. या गुन्ह्यांविरोधात या पुरुषाने याचिका दाखल केली. श्रीमंत व्यक्तींबरोबर मैत्री करणं, त्यांच्याकडून पैसे मिळवणं आणि नाही मिळाले तर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा या महिलेचा इतिहास असल्याचा दावा या व्यक्तीने केला. यासंदर्भात या पुरुषाने संबंधित महिलेचा सहभाग असलेल्या एका प्रकरणाची माहितीही कोर्टाला दिली. या महिलेने एका पुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेवले होते. नंतर त्याच्याविरोधात बंगळुरु एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये आपल्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीसारखीच तक्रार दाखल केली आहे असं कोर्टाला सांगितलं. या महिलेने नंतर स्वत: केलेले आरोप मागे घेतल्याने 2016 साली कोर्टाने या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती या पुरुषाने कोर्टाला दिली. महिलेसंदर्भातील सर्व माहिती, तिचा आधीच्या प्रकरणांमध्ये असलेला सहभाग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघांनी संमतीने शरीरसंबंध ठेवल्याच्या मुद्द्यावरुन सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर कर्नाटक हायकोर्टाने या पुरुषाच्या बाजूने निकाल दिला.