नवी दिल्ली : महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना कमी होत असल्याचं दिसत नाहीये. आता पून्हा एकदा महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात एका महिलेवर चार तरुणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेचा आरोप आहे की, दारुच्या नशेत चार तरुणांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत सोडून फरार झाले.
पीडित महिला सिविल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हरथला रेल्वे स्टेशनच्या बाहेर बेशुद्धावस्थे आढळली होती. या महिलेला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
चौकशीत पीडित महिलेने सांगितले की, "ती उत्तराखंडमधील बाजपूर येथील रहिवासी आहे. शनिवारी सकाळी ट्रेनने बिजनौर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होती. ट्रेनमध्ये तिला चौघेजण भेटले आणि त्यांनी तिला कोल्ड ड्रिंकमध्ये दारू मिसळून पाजली. यानंतर चालत्या ट्रेनमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला."
पीडित महिलेची स्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तर, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.