मुंबई : World Bank Policy Research: देशातील गरिबीबाबत एक संशोधन समोर आले आहे. भारतात अत्यंत गरीबांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आठ वर्षांत भारतात 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे. जागतिक बँकेच्या पॉलिसी रिसर्च वर्किंग पेपरच्या संशोधनानुसार 2011 च्या तुलनेत 2019 मध्ये 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे.
जागतिक बँकेच्या पॉलिसी रिसर्चने आपल्या रिसर्च पेपरमध्ये म्हटले आहे की, 2011 मध्ये भारतात गरीबांची संख्या 22.5 टक्के होती, जी 2019 मध्ये 10.2 टक्क्यांवर आली आहे. या वर्किंग पेपरमध्ये पुढे म्हटले आहे की, भारताने अत्यंत गरिबीचे जवळजवळ उच्चाटन केले आहे.
देशात सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध अन्न योजनांमुळे उपभोगातील असमानता गेल्या 40 वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.
हा शोधनिबंध अर्थशास्त्रज्ञ सुतीर्थ सिन्हा रॉय(Sutirtha Sinha Roy) आणि रॉय व्हॅन डेर वेईड (Van Der Weide) यांनी संयुक्तपणे लिहिले आहेत. संशोधन पत्रानुसार, 2011 ते 2015 दरम्यान अत्यंत गरिबीचा दर 3.4 टक्क्यांनी कमी झाला आहे.
2015 ते 2019 दरम्यान, अत्यंत गरिबीच्या दरात 9.1 टक्क्यांनी घट झाली आहे, जी 2011-15 च्या तुलनेत 2.6 पट अधिक आहे. अहवालानुसार, 2013-19 दरम्यान, सर्वात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील दरवर्षी 10 टक्के दराने वाढले.
गरिबीच्या दरात घट होण्याचा थेट संबंध रोजंदारीच्या वाढीशी आहे. 2017-18 या कालावधीत गरिबीत सर्वाधिक घट झाली. या काळात असंघटित कामगारांच्या वेतनात सर्वाधिक वाढ झाली. 2011 पासून रोजंदारीमध्ये झपाट्याने वाढ झाली आणि त्यामुळे गरिबीचे प्रमाण कमी होऊ लागले.