सेल्फी घेण्याच्या नादात बंदुकीची गोळी लागून एकाचा मृत्यू

सेल्फी घेत असताना ट्रिगर सुटल्याने गाडीतच गोळी लागली. 

Updated: Apr 14, 2019, 04:53 PM IST
सेल्फी घेण्याच्या नादात बंदुकीची गोळी लागून एकाचा मृत्यू  title=

नवी दिल्ली : दिल्लीतील रंजीतनगर पुलावर शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जफराबादहून इंडिया गेट फिरण्यासाठी आलेल्या तीन मित्रांना त्यांचा सेल्फी घेणे महागात पडले आहे. यात २० वर्षीय सलमानचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोळी मारण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सौहेल नावाच्या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जफराबादहून सलमान, सौहेल आणि आमिर हे तीन मित्र आपल्या टोयटा क्रेटा गाडीतून इंडिया गेट फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी तेथून परत जात असताना गोळी लागल्याने तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला. 

गाडीतून परत जात असताना बाराखंबा भागात रंजीत सिंह पुलाजवळ तिघेही सेल्फी घेण्यासाठी थांबले होते. परंतु सेल्फी घेत असताना ट्रिगर सुटल्याने गाडीतच गोळी लागली. गोळी सलमानच्या डोक्यात आरपार घुसली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सलमानला सौहेल आणि आमिरने जवळच्याच एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले. सलमानला रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सौहेलला ताब्यत घेतले असून आमीर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांकडून सौहेलजवळील देशी कट्टा आणि गाडी जप्त करण्यात आली आहे. 

सौहेलने चौकशीदरम्यान सांगितले की, आम्ही सेल्फी घेऊन त्याचा व्हिडिओ करून सोशल मिडियावर अपलोड करत होतो. त्यादिवशीही तसेच सुरू होते परंतु अचानक ट्रिगर दाबला गेला आणि गोळी लागल्याचे सौहेलने सांगितले. पोलिसांनी सौहेलला ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू असून आमिर फरार आहे. गोळी मुद्दाम मारली की, सेल्फीच्या नादात चुकून लागली याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.